Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 August, 2010

तेलगळतीमुळे सागरी महासंकट!

दर तासाला तीन टन तेल समुद्रात पंतप्रधानांनी अहवाल मागविला
तूर्तास मासे न खाण्याचे आवाहन जहाज मालकांविरोधात कारवाई

मुंबई, दि. ९ : कुलाबा समुद्रकिनाऱ्यालगत झालेल्या दोन व्यापारी जहाजांच्या धडकीत एक जहाज जवळपास बुडाले असून त्यातून झालेल्या तेलगळतीचा धोका मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला निर्माण झाला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज यासंदर्भात जल वाहतूक मंत्रालयाकडून अहवाल मागविला आहे.
एमएससी चित्रा व खलिजा या दोन जहाजांत धडक झाल्याने यांपैकी एका जहाजातून तेलगळतीला सुरुवात झाली आहे व त्याचे भीषण परिणाम दिसू लागले आहेत. टक्कर झालेल्या "चित्रा' या बोटीमधील तेल झपाट्याने पसरत चालले असून त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न झाला आहे. दर तासाला तीन टन तेल समुद्रात पसरते आहे. माशांसह समुद्री जलचरांना धोका पोहोचवणारा हा तेलाचा तवंग मुंबईसह एलिफंटा बेट तसेच अलिबागच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचला आहे.
सोडियम हायड्रॉक्साईड या रसायनांमुळे प्रदूषित झालेल्या या पाण्याचा वापर करू नये, असा इशारा तटरक्षक दलाने "बीएआरसी'ला दिला आहे. या तेल गळतीमुळे परिसरातील खारफुटीलाही धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. तेल गळतीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हवाई पाहणी केली.
दरम्यान या बोटींच्या टकरीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जहाज मंत्रालयाकडून अहवाल मागविला आहे. या प्रकरणी राज्यसभेत आज आवाज उठवण्यात आला. पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दोन्ही जहाज मालकांच्या विरोधात चौकशीला सुरुवात झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाने याप्रकरणी दोन्ही जहाज मालकांविरोधात न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली असल्याचे रमेश यांनी सांगितले.
तेल गळतीनंतर राज्य सरकार आणि सागरी खात्याने मासेमारीवर बंदी घातली आहे. या तेल गळतीमुळे माशांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होऊन त्याचा फटका छोट्या मच्छीमारांना बसणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे. सध्या मासे खाऊ नयेत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. परिणामी मच्छीमारांना आणखी मोठा फटका बसणार आहे. तेल गळतीमुळे मच्छीमारांचे काम ठप्प झाले असून याकरता सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे महाराष्ट्र मच्छीमार असोसिएशनचे प्रमुख दामोदर तांडेल यांनी सांगितले. या तेल गळतीचा मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला फटका बसला आहे.
कॉन्स्टेबल बुडाला
गेल्या शनिवारी दुसऱ्या एका जहाजाबरोबर झालेल्या धडकीनंतर एमएससी चित्रा या बुडणाऱ्या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई शहर पोलिस दलाच्या समुद्री शाखेच्या पोलिसांबरोबर समुद्रात गस्त घालणाऱ्या स्पीड बोटीतील एका पोलिस कॉन्स्टेबलला समुद्रात पडून जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुडालेल्या कॉन्स्टेबलचे नाव रमेश तुकाराम मोरे (वय ४५) असे आहे. मोरेसह चार कॉन्स्टेबल या जहाजावर स्पीड बोटीतून लक्ष ठेवून होते. ही घटना आज पहाटे चित्रा व्यापारी जहाजाजवळच घडली. मोरेचा मृतदेह नंतर हाती लागला व तो जे. जे. इस्पितळात पाठविण्यात आला.

No comments: