Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 August, 2010

सीमाप्रश्नी एकत्रितपणे इतिहास घडवू...!

कोल्हापूर मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - झाले तेवढे पुरे झाले. मराठी माणसाने आतापर्यंत बराच अन्याय सहन केला. पण आता नाही. कर्नाटकात गेलेली जमीन परत मिळविण्यासाठी आता निकराचा लढा द्यावाच लागेल. त्यासाठी आपण सारे एकत्र येऊ आणि इतिहास घडवू...! शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाने बेळगाव सीमा लढ्यात नव्याने चैतन्य निर्माण केले. कोल्हापूरच्या पेटाळा मैदानावर झालेल्या सीमाबांधवांच्या विराट मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. या मेळाव्यात अक्षरश: हजारो सीमाबांधव उपस्थित होते. बेळगाव सीमालढ्यात नव्याने मैदानात उतरण्याचा निर्धार या सीमाबांधवांनी एकदिलाने व्यक्त केला. यावेळी पत्रकार किरण ठाकूर यांना सभेत बोलण्यास विरोध करीत उपस्थित हजारोंनी त्यांच्याविरूद्ध घोषणा दिल्या.
आ. राजेश क्षीरसागर, दिवाकर रावते, चंद्रदीप नरके, सुजीत मिणचेकर, संजय पवार, विजय देवणे यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते.दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळणे, कर्नाटक पोलिसांनी चालविलेला मराठी माणसांवरचा अन्याय रोखण्यासाठी सीमेवर केंद्रीय सीमादल तैनात करणे, शासकीय पत्रके, शेतकऱ्यांचे सातबाराचे उतारे मराठीतून देण्यात यावेत, शिवसेनेची संसदीय समिती स्थापन करणे, केंद्राच्या भूमिकेचा तीव्र निषेध करणे असे विविध ठराव या मेळाव्यात एकमुखाने पारित करण्यात आले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बेळगावचा लढा लढताना आपल्याला इतिहास घडवायचा आहे. भविष्यात आपल्याला षंढ, करंटे म्हणवून हिणवून घ्यायचे नसेल, तर ही लढाई शेवटापर्यंत लढू या!
केंद्र सरकारला देशातील इतर सर्व भाषांबद्दल कळवळा आहे. पण मराठी भाषेची बाजू घ्यावीशी त्यांना कधीच वाटत नाही. ज्या भागातील लोक मराठी बोलतात, तो भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची चाललेली धडपड दुर्दैवी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री हा भाग महाराष्ट्राला देण्यास स्पष्टपणे नकार देतात आणि मुंबईत येऊन मराठी उद्योजकांना मात्र कर्नाटकात गुंतवणुकीची गळ घालतात. सीमेवरील मराठी गावे हा महाराष्ट्राचा अधिकार आहे. दुर्दैवाने दिल्लीतले षंढ सरकार या प्रश्नी काहीही करू शकत नसल्याचे दिसून येत आहे. इथून निवडून गेलेले खासदारही दिल्लीत जाऊन मूग गिळून गप्प बसतात. मात्र, आता कर्नाटक आणि दिल्लीतल्या सरकारांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. यापुढे मराठीजनांवर अन्याय कराल, तर याद राखा, असे कर्नाटक सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. सीमा प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी केवळ बेळगावच नाही, तर गरज पडल्यास बंगलोर आणि दिल्लीतही धडक मारण्याची सिंहगर्जना ठाकरे यांनी यावेळी केली.
शिवसेनेसोबतच इतरही राजकीय पक्षाच्या खासदारांनीही दिल्लीत मराठी माणसाच्या मनातली भूमिका मांडली पाहिजे तर दुसरीकडे तरुण पिढीने या लढाईत उतरले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments: