Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 13 August, 2010

व्यावसायिक गैरवर्तणूक प्रकरणी ऍड. सुबोध कंटक यांना बार कौन्सिलची नोटीस

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - व्यावसायिक गैरवर्तणूक केल्याप्रकरणी गोव्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांना आज महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला त्यांनी पंधरा दिवसांत उत्तर द्यायचे आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीची गंभीर दखल कौन्सिलने घेतली आहे.
माजी मंत्री तथा आमदार दयानंद नार्वेकर, उपसभापती माविन गुदिन्हो व सोमनाथ जुवारकर यांच्या विरोधातील फौजदारी खटला हाताळणाऱ्या विशेष सरकारी वकील ए पी. कार्दोज व व्ही पी. थळी यांची सेवा खंडित करण्याची शिफारस करणारी टिपणी ऍडव्होकेट जनरल कंटक यांनी १५ जुलै २००५ रोजी केली होती. ऍड. कंटक हे ऍडव्होकेट जनरल होण्यापूर्वी या मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या खटल्यांत बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहत होते. या ठळक बाबीकडे ऍड.आरयिश यांनी बार कौन्सिलला सादर केलेल्या तक्रारीत लक्ष वेधले आहे.
कंटक हे ऍडव्होकेट जनरल होण्यापूर्वी माजी मंत्री दयानंद नार्व्हेकर, मावीन गुदिनो व सोमनाथ जुवारकर याच्या बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहत असल्याने आपल्या मंत्री अशिलांच्या फायद्यासाठी त्यांनी अशा प्रकारची टिपणी पाठवणे अयोग्य असल्याचे मत ऍड. आयरिश यांनी तक्रारीत मांडले आहे. ज्या मंत्र्याच्या वतीने फौजदारी खटल्यांत सुबोध कंटक हे बाजू मांडत होते, त्याच मंत्र्यांच्या खटल्यांत कंटक यांनी ऍडव्होकेट जनरल म्हणून विशेष सरकारी वकील बदलण्याची शिफारस केली होती, ही बाब माहिती हक्क कायद्याखाली आयरिश यांना मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाली आहे.
ऍड. कंटक यांनी ६ जुलै २००६ रोजी एका टिपणीद्वारे आपले अशील असलेल्या माजी मंत्र्यांची बचावार्थ गोवा सरकारने मुंबई येथील ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांची सेवा प्रत्येक सुनावणीस १ लाख ३५ हजार रुपयांच्या शुल्कावर घेण्याची शिफारस केली होती. माजी मंत्र्यांच्या संदर्भातील या खटल्यात सरकारच्या डावपेचासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ऍड.कंटक यांनी ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांच्यासमवेत ३ जुलै ०६ रोजी मिरामार येथील मेरियट हॉटेलमधील खोली क्रमांक १२५ मध्ये एक गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही ऍड. आयरिश यांनी तक्रारीत केला आहे.

No comments: