Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 18 July, 2010

कोणत्याही मंत्र्याला डच्चू नाही - येडियुरप्पा

नवी दिल्ली, दि. १७ - माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर होत असलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून त्यामुळे कोणालाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मात्र जर हे आरोप सिद्ध झाले तरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज येथे स्पष्ट केले.
मंत्रिमंडळातील माझ्या कुठल्याही सहकाऱ्यावर आरोप नाहीत. मात्र, असे झाल्यास २४ तासांच्या आत त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्यात येईल, असे येडियुरप्पा यांनी येथे गृहमंत्री पी. चिदंबरम् यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलेे. १९९० च्या दशकात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर हवालाकांडात आरोप झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता आणि आपल्या सहकाऱ्यांनाही राजीनामा देण्यास सांगितले होते. अडवाणी यांच्या या कृतीप्रमाणे आपण काही निर्णय घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पर्यटनमंत्री जी. जनार्दन रेड्डी आणि महसूलमंत्री जी. करूणाकर रेड्डी यांच्यावर धर्मनिरपेक्ष जनता दल आणि कॉंग्रेस पक्षाकडून होत असलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
अवैध उत्खननाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यास सरकार का नकार देत आहे?, असे विचारले असता याची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांना आवश्यक ते सर्व अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. याची चौकशी करताना लोकायुक्त केेंद्रीय, राज्य किंवा इतर कुठल्याही संस्थांची मदत घेऊ शकतात. २००२ पासूनची सर्व प्रकरणं आम्ही लोकायुक्तांकडे देणार आहोत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य बाहेर येईल आणि जे कुणी यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
चिदंबरम् यांच्याशी झालेल्या भेटीत अवैध उत्खनन, लोकायुक्त संतोष हेगडे यांचे राजीनामा प्रकरण, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आणि बेळगावमधील सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

No comments: