Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 19 July, 2010

अयोध्येत राममंदिर उभारणारच

साधुसंतांना प्रतीक्षा न्यायालयाच्या निवाड्याची

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - अयोध्येत प्रस्तावित राम जन्मस्थानी भव्य राम मंदिर उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला असून यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. "श्री हनुमत् शक्ती जागरण समिती'तर्फे या प्रस्तावित मंदिराच्या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्राचे मंदिर उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. नुकतेच हरिद्वार येथे झालेल्या परमपूज्य जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी वासुदेवानन्द सरस्वती महाराज याच्या अध्यक्षतेखाली सुमारे १७ हजार साधुसंतांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत हा ठराव संमत करण्यात आला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात रामजन्म भूमीच्या विवादावर लखनौ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने ही जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
या दृष्टीने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. श्रीराम जन्मभूमी हा कोणी "व्होटबॅंक'चा विषय बनवू नये. राजकीय विचारांच्या वर येऊन सर्वांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी सहयोग करावा, अशी हाक विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक जी. सिंघल यांनी दिली आहे. या ठरावाबरोबरच गंगा नदीवर कोणताही बांध बांधू न देण्याचा आणि गोरक्षणासाठी देशव्यापी कार्य आणि योजनांचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला आहे.
श्रीराम जन्मभूमी ही संपत्ती नाही. हिंदूसाठी ती श्रद्धा-आस्था आहे. म्हणूनच रामभक्त या भूमीवर स्वतःच मस्तक ठेवतात. हा विवाद म्हणूनच संपत्तीचा वाद नाही, त्यामुळे हा विषय न्यायालयाचा अथवा न्याय यंत्रणेचा होऊ शकत नाही, कारण कुठलेही न्यायालय, न्यायमूर्ती, न्यायव्यवस्था आस्था, श्रद्धा, प्रेरणा यांचा निर्णय देऊ शकता नाही, असे मत कुंभमेळ्यातील संतांनी व्यक्त केले आहे.
१९८८-८९ मध्ये प्रस्तावित मंदिराचे सोमपुरांची प्रारूप तयार करून देशभरातून असंख्य रामभक्तांकडून प्रत्येकी १ रुपया जमवून या मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली आहे. माहितीनुसार, मंदिर केवळ दगडांपासूनच बनणार आहे. सिमेंट, कॉंक्रीट, लोखंड हे मंदिरासाठी वापरले जाणार नाही. मंदिर दोन मजली असणार आहे. तळमजल्यावर रामलला व पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे. मंदिराची लांबी २७० फूट, रुंदी १३५ फूट तर, उंची १२५ फूट बनवले जाणार आहे. १०६ खांब व ६ फूट जाड दगडाच्या भिंती, उत्कृष्ट कोरीव काम हे प्रस्तावित मंदिराचे वैशिष्ट्य असणार आहे. दगडांचे कोरीव काम शिल्प कार्यशाळा अयोध्या, राजस्थान पिण्डवाडा, मकराना येथे अखंड सुरू आहे. तळमजल्यावरील १०८ खांबांची नक्षीकामासहित तयार आहेत.
आता रामभक्त केवळ वाट पाहतात ती न्यायालयाच्या निवाड्याची. न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर गेल्या वीस वर्षापासून ही सुनावणी सुरु आहे. पिठाचे १२ वेळा पुनर्गठन झाले असून साक्षी, पुरावे, तपासणी काही प्रमाणात अपूर्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: