Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 July, 2010

सोनिया तोरादोला सशर्त जामीन

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी गुन्हा अन्वेषणाने शुक्रवारी ताब्यात घेतलेल्या तिच्या आई सोनिया तोरादो हिला आज येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला व त्यामुळे गेला महिनाभर चालू असलेल्या या प्रकरणातील कायदेशीर लढाईत गुन्हा अन्वेषण विभागाची प्रथमच पीछेहाट झाली आहे.
सोनियाने दाखल केलेल्या जामीनअर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्यासमोर काल उभय पक्षांचे युक्तीवाद झाले होते व त्यानंतर आज निवाडा देताना न्यायमूर्तींनी तिची वीस हजार रुपयांच्या व्यक्तिगत हमीवर तसेच तेवढ्याच रकमेचा एक हमीदार घेऊन मुक्तता करावी असा आदेश दिला. त्याशिवाय त्यांच्यावर त्यांनी पोलिस अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे, पोलिस तपासात संपूर्ण सहकार्य द्यावे, पुराव्यात वा साक्षीदारांत हस्तक्षेप करू नये व न्यायालयाच्या पूर्वपरवानगी खेरीज गोव्याबाहेर जाऊ नये,अशा अटी घातल्या आहेत.
आरोपी ही महिला आहे व तिने यापूर्वीच पाच दिवस कोठडीत व्यतीत केलेले असून तिच्याकडून पुरेशी माहितीही गोळा झालेली आहे, ती फरारी होण्याची वा चौकशीसाठी हजर राहणार नाही अशी कोणतीही शक्यता नाही व म्हणून अशा चौकशीस हजर राहण्याच्या अटी घालूनच तिला जामीन दिला जात असल्याचे न्यायाधीशांनी आपल्या ११ पानी निकालपत्रात म्हटले आहे.
आरोपीची पार्श्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही, ती पेशाने माजी शिक्षिका होती , आत्तापर्यंत तिने तपासाला संपूर्ण सहकार्य केलेले आहे, या जामीन अर्जप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या उत्तरांतील विविध मुद्यांचा आधार न्यायाधीशांनी जामीन मंजूर करताना घेतलेला आहे. आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर आरोपीची चौकशी करण्यात आली, पण त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. कोणत्याही वस्तू त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना हस्तगत करता आलेल्या नाहीत, असे नमूद करून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने कु. हर्ष सहाने व गुडीकांती नरसिंहुलू खटल्यात दिलेल्या निवाड्याचा आधार घेतला आहे.
पुरावे नष्ट केल्याचेच तेवढे आरेाप अर्जदारावर असतील तर या प्रकरणी ती चौकशी झालेली आहे व ते आरोप जामीनपात्र असल्याचे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात अर्जदार गुंतल्याचे तपास अधिकाऱ्यांनी कुठेच नमूद केलेले नाही, मोबाईल फोन क्रमांक व इतर तपशील यापूर्वीच तपास अधिकाऱ्यांकडे पोचलेले आहेत, आता बाकी आहे तो त्यांतील संभाषणाचा तपशील, पण त्यासाठी आरोपीची गरज नसल्याने त्यांना जामीन दिला जात असल्याचे निकालपत्रात म्हटले आहे.
शुक्रवारी हा अर्ज दाखल झाल्यावर शनिवारीच हे युक्तिवाद होणार होते पण अर्जदाराचे वकील राधाराव ग्रासियश यांनी त्यासाठी सोमवारपर्यंत वेळ मागून घेतला व त्याप्रमाणे काल सकाळी हे युक्तिवाद झाले व न्यायाधीशानी निकाल राखून ठेवला होता.

No comments: