Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 July, 2010

ड्रग व्यवसाय रोखण्यात राज्य सरकार अपयशी

रोमन कॅथलिक चर्चची टीका
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): पोलिस, राजकारणी आणि ड्रग माफिया यांचे कथित साटेलोटे दडपण्याचा प्रकार वाढत असून गोव्यात फोफावत चाललेल्या ड्रग व्यवसायावर अंकुश ठेवण्यात राज्यातील कॉंग्रेस सरकारला अपयश आल्याची जोरदार टीका रोमन कॅथलिक चर्चने केली आहे. "सोशल जस्टिस ऍन्ड पीस'चे कार्यकारिणी सचिव तसेच चर्चचे फादर मेव्हरीक फर्नांडिस यांनी ही टीका केली आहे. राज्याची पोलिस यंत्रणाही ड्रग माफियांच्या हातात हात मिळवून आहे आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत या घटनेची प्रामाणिकपणे चौकशी करण्यास तयार नाहीत, अशीही टीका फा. मेव्हरिक यांनी केली आहे.
प्रसिद्धी माध्यमांनी खाकी गणवेशातील व्यक्ती कसे या प्रकरणात गुंतलेले आहेत, याचा भांडाफोड केला आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी मात्र या भ्रष्ट लोकांना वाचवण्याची नवी प्रथा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास लावण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही. पोलिसांच्या तपासकामावर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत, संशयितांना मोकळे सोडण्यासाठी तपासकामात पळवाटा ठेवल्यात जात आहे, हे आता समस्त गोमंतकीयांच्या लक्षात आले आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
पोलिस ड्रग माफिया प्रकरणात गृहमंत्री रवी नाईक यांचा पुत्र रॉय नाईक यांचाही संबंध असल्याचा आरोप झाला असून विरोधी पक्ष, कॉंग्रेस पक्षाचा विद्यार्थी विभाग"एनएसयुआय' तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व अन्य संस्थांनी याची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

No comments: