Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 18 July, 2010

सुदीप ताम्हणकरांचे उद्यापासून उपोषण

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - तिकीट दरवाढीचा विषय निकालात काढण्यास सरकारला पूर्ण अपयश आले असल्याने आता आंदोलन करणे अपरिहार्य असल्याचे अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर म्हटले आहे. खाजगी बस वाहतूक बंद करून प्रवाशांना वेठीस धरणे संघटनेला मान्य नाही. त्यामुळे तिकीट दरवाढीच्या विषयावरून आपण १९ जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
सरकारने शिफारस केलेल्या तिकीटदरवाढीचा ७, ९ व ११ किलोमीटर पर्यंतच्या प्रवासी मार्गावरील बसगाड्यांना काहीही फायदा होत नाही. ही गोष्ट वाहतूक खात्याच्या लक्षात आणून दिली असतानाही त्याबाबत निर्णय घेण्यास चालढकलपणा केला जात आहे. याविषयी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते, परंतु अखेरच्या क्षणी त्यांनीही पाठ फिरवल्याने आता आंदोलनाचा पवित्रा घेणे अपरिहार्य आहे,असे श्री. ताम्हणकर म्हणाले. खाजगी बस वाहतूकदार नफ्यात आहेत व ते हजारो रुपये कमावतात, या नजरेनेच सरकार या व्यावसायिकांकडे पाहते. हा व्यवसाय चालवण्यासाठी खाजगी बसमालक कोणत्या स्थितीचा सामना करतात व त्यांची आर्थिक अवस्था कशी आहे याचे अजिबात भान सरकारला नसून खाजगी बसमालकांना तिकीट दरवाढ देताना नेहमीच आडकाठी केली जाते. एरवी सरकार अनेक मार्गांनी जनतेची लूट करीत असते; पण खाजगी बस तिकीट वाढवली तर जनता नाराज होईल, अशा सबबी पुढे केल्या जातात. वाहतूक अधिकारी खाजगी बसमालकांना कसे लुटतात याची माहिती सामान्य प्रवाशांनाही आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय मागण्या मान्य होण्याचीच शक्यता नाही, असे श्री. ताम्हणकर म्हणाले.
सध्याच्या तिकीटदरवाढीमुळे बहुतांश सिटी बसगाड्यांना काहीही लाभ होत नाही. मडगाव येथील काही खाजगी बसमालकांनी याविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी बसमालकांना वाहतूकमंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्रीही याप्रकरणी पुढाकार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळेच आंदोलन करणे गरजेचे आहे, असेही बसमालकांचे म्हणणे आहे. सर्व बसमालकांनी सुदीप ताम्हणकर यांना पाठिंबा व्यक्त करून या उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments: