Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 July, 2010

आझिलोत फ्रेम कोसळून महिला गंभीर जखमी

विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले
म्हापसा, दि. २३ (प्रतिनिधी): आझिलो इस्पितळात रुग्णाला भेटण्यासाठी गेलेल्या प्रभालता नाईक (५५) या महिलेच्या डोक्यावर टांगलेली फोटोफ्रेम तुटून पडून गंभीर जखम झाल्याने तिला अकरा टाके पडले. या घटनेची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, माजी आमदार सदानंद तानावडे यांनी आझिलोत अपघाती तिची विचारपूस केली.
प्रभालता नाईक हिची जाऊ तेजस्विनी नाईक हिचा हात मोडल्यामुळे गेले आठ दिवस ती आझिलोत दाखल होती. आज २३ रोजी तेजस्विनी हिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने प्रभालता तिच्याबरोबर जुन्या इस्पितळातील पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबली होती. या ठिकाणी अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक असल्याने प्रभालता भिंतीजवळ जाऊन बसली. प्रभालता बसलेल्या ठिकाणी वर एक भला मोठा फोटो लावला होता तो अचानक कोसळून तिच्या डोक्यावर पडला. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यावेळी तिच्यावर उपचार करून जखमेवर अकरा टाके घालावे लागले व तिला आझिलोत दाखल करून घेण्यात आले. ही वार्ता सर्वप्रथम सदानंद शेट तानावडे व नंतर आमदार दयानंद मांद्रेकर यांना मिळताच त्यांनी इस्पितळात येऊन अपघाती रुग्णांची पाहणी केली. यावेळी इस्पितळाची पाहणी केल्यानंतर आझिलोच मरणाच्या वाटेवर असून रुग्णाला चांगली सेवा कशी मिळेल, अशा शब्दात इस्पितळातील कारभाराचा निषेध करण्यात आला. यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी इस्पितळात दाखल होऊन अपघात झालेल्या रुग्णांची विचारपूस तसेच इस्पितळाच्या दुर्दशेची झलक पाहिली. अपघातात सापडलेली महिला प्रभालता हिला बांबोळी येथे नेऊन तिचे स्कॅनिंग करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी आझिलोचे प्रमुख अधिकारी संजीव दळवी यांना मंत्र्यांनी धारेवर धरले. आझिलोच्या दुर्दशेबद्दल किंवा येथील स्थिती काय आहे याची माहिती का करून दिली जात नाही? असे प्रश्न विचारून आरोग्यमंत्र्यांनी त्यांना खडसावून काढले. पेडे येथील जिल्हा इस्पितळात सर्व सुविधा उपलब्ध होतील, लवकरच इस्पितळ सुरू केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

No comments: