Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 18 July, 2010

मतदारयादीत परप्रांतीयांचा प्रचंड भरणा करण्याचे सत्र

चिंबलवासीयांचा गंभीर आरोप
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- चिंबल पंचायतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बिगरगोमंतकीयांचा मतदारयादीत भरणा करण्याचे सत्र सुरू आहे, असा गंभीर आरोप चिंबलवासीयांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ बिगरगोमंतकीयांची बेकायदा नावे मतदारयादीतून वगळावीत, अशी आग्रही मागणी करून शेकडो सह्यांचे निवेदनच चिंबलवासीयांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
चिंबल ग्रामसेवा कला आणि सांस्कृतिक मंचाचे निमंत्रक रूमाल्डो कार्वालो यांनी ही माहिती दिली.चिंबलवासीयांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंबल गावात सुमारे सहा हजार स्थलांतरित लोक वास्तव्य करतात. विशेषकरून इंदिरानगर वस्ती ही पूर्णपणे स्थलांतरित लोकांनी व्यापली आहे. तिथे दिवसागणिक रोज नव्या स्थलांतरितांचा भरणा सुरू आहे. बिगरगोमंतकीय व विशेषकरून स्थलांतरित लोकांना तेथे आश्रय देऊन त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करून मतपेढ्या बळकट करण्याचे काम जोरात सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत व मामलेदार कार्यालयाच्या संगनमताने हा घोटाळा सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, निवडणूक अधिकारी चिंबल गावच्या मतदारयादीसंबंधी चर्चा करण्यासाठी पंचायतीत आले असता त्याची कोणतीही पूर्वकल्पना लोकांना देण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर सरपंचांनीही लोकांची दिशाभूल करून ही बैठक अन्य कारणांसाठी असल्याचे सांगितल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याठिकाणी आलेल्या बिगरगोमंतकीयांना एका महिन्यात रेशनकार्ड व मतदार ओळखपत्र देण्यात येते, अशीही खात्रीलायक माहिती असून त्याची तात्काळ चौकशी व्हावी, अशी मागणीही चिंबलवासियांनी केली आहे.
चिंबलवासीयांचे सध्या अस्तित्वच धोक्यात आले असून या गावाला पूर्णतः बिगरगोमंतकीयांनी वेढा घातला आहे. सुमारे पाच पंच सदस्य हे बिगरगोमंतकीय निवडून आलेले आहेत, यावरून ही बिकट परिस्थिती लक्षात येते. हा प्रकार ताबडतोब बंद झाला नाही तर भविष्यात चिंबलवासीयच आपल्या गावात अल्पसंख्य होतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

No comments: