Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 23 July, 2010

'एड्स'ला प्रोत्साहन देणाऱ्या 'आय-पील'वर त्वरित बंदी घाला

विरोधकांची सभागृहात जोरदार मागणी टीबी इस्पितळाचा दर्जा सुधारणार : विश्वजित
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): मुक्त शरीरसंबंधांना उघड प्रोत्साहन देऊन एड्ससारख्या भीषण रोगाला निमंत्रण देणाऱ्या "आय-पील' या गर्भप्रतिबंधक गोळ्यांवर तात्काळ बंदी घालण्याची जोरदार मागणी आज विधानसभेत करण्यात आली. एड्स रोखण्यासाठी "निरोध'चा वापर अनिवार्य असताना मध्येच ही "आय-पील'ची होणारी जाहिरात एकूण एड्सप्रतिबंधक मोहिमेतच मोठा अडथळा ठरण्याची शक्यता असल्याचे विरोधकांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. गोव्यात २००७ ते २०१० या चार वर्षांच्या काळात ४११ जण एड्समुळे मरण पावल्याचे सांगून हा आजार दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागल्याने या विषयाकडे आता अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक यांनी सांगितले.
दामू नाईक यांनीच आज प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे या विषयाकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. राज्यात गेल्या चार वर्षांत क्षयरोग व साथीच्या रोगांमुळे अनुक्रमे ४७१ व ५३३ जणांचा मृत्यू झाला. हा आकडा सभागृहापुढे सादर केलेल्या आकड्यापेक्षाही मोठा असावा. केवळ एड्समुळे मृत झालेल्यांची संख्यादेखील मोठी असावी. एड्सच्या चाचणीसाठी अनेक जण शेजारील राज्यात जातात, अनेक जण हा आजार लपवत दिवस काढतात व नंतर निराश होऊन आत्महत्याही करतात. त्यामुळे एड्स रुग्णांचा खरा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे. त्यावर कठोर उपाययोजना करणे काळाची गरज बनली असताना "आय-पील'सारख्या गोळ्यांची जाहिरात सरकारच्याच प्रयत्नांवर पाणी फेरत असल्याचे दिसत आहे. "वाट्टेल तशी मौज करा आणि ४८ तासांत एक आय-पील गोळी घ्या' ही जाहिराती निरोधसक्तीलाच फाटा देऊन खुल्या शरीरसंबंधांना प्रोत्साहन देत असल्याचे दामू नाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. खरेतर ही जाहिरात तात्काळ बंद व्हायला हवी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीसुद्धा ही जाहिरात घातक असल्याचे मान्य केले. सदर जाहिरातीमुळे एड्स नियंत्रण सोसायटीच्या मोहिमेचा उद्देशच धोक्यात येण्याची शक्यता त्यांनीही व्यक्त केली. मात्र राज्य सरकारकडून ही जाहिरात केली जात नाही आणि सरकार ती करणारही नाही. राष्ट्रीय वाहिन्यांवरून ती प्रसारित होत असल्याने आम्ही हा विषय केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडे नेऊ आणि आमच्या तीव्र भावना त्यांना कळवू, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
एड्स ही आजची गंभीर समस्या आहे. युवा पिढीमध्ये त्याच्या धोक्याची चर्चा होणे आणि या संकटाबद्दल त्यांना सावध करणे ही काळाची गरज आहे. ती लक्षात घेऊन दहावी आणि बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये एड्स नियंत्रण सोसायटी व आरोग्य खात्यातर्फे जागृती मोहीम राबवणे सुरू आहे. काही शाळा अशा मोहिमेला पाठिंबा देत नाहीत. तथापि, आता सगळ्यांनी एकत्र येऊन एड्सविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी मान्य केले.
दामू नाईक यांनी हा विषय वेगळ्या स्वरूपाचा असल्याने शब्दांच्या चौकटीतच तो आपणास मांडावा लागतो असे सांगतात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व सभापती प्रतापसिंह राणे यांनी खुलेपणाने या विषयावर चर्चा होणे आवश्यक असून विद्यार्थ्यांमध्ये त्यासंदर्भात जागृती झाली पाहिजे, असे स्पष्ट केले. एड्सग्रस्त निराशेतून मोठ्या संख्येने आत्महत्या करतात, ही बाबही खूपच गंभीर असल्याचे विरोधी पक्षनेते पर्रीकरांनी नमूद केले.
राज्यात क्षयरोगाची स्थितीही गंभीर असल्याचे सांगून तांबडी माती येथील क्षयरोग चिकित्सा इस्पितळाची स्थिती अत्यंत दयनीय बनल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिले. अलीकडेच आपण स्वतः जाऊन त्या इस्पितळाची पाहणी केली. एका रुग्णाची चौकशी करण्यासाठी आपण गेलो होतो; परंतु तेथे जाणाऱ्या माणसाला स्वतःच रुग्ण होण्याची भीती वाटावी अशी त्या इस्पितळाची भयंकर स्थिती असल्याचे पर्रीकरांनी नमूद केले. क्षयरोग हा सहज बरा होणारा आजार नसल्याने त्यातून खंगणारे रुग्णही मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. त्यामुळे या इस्पितळाची स्थिती सुधारून लोकांना दिलासा द्या, असे आवाहन त्यांनी केले.
विश्वजित राणे यांनी ही गोष्ट मान्य करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी राज्याला मंजूर झालेल्या पन्नास कोटींपैकी मोठा निधी या इस्पितळाच्या दुरुस्तीवर आणि साधनसुविधांवर खर्च केला जाईल, असे आश्वासन दिले. खरेतर हे इस्पितळ बांबोळी येथील "गोमेकॉ'च्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत हालवण्याचा आपला विचार होता; परंतु हे इस्पितळ आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याचा विकास करण्याचे आता निश्चित झाले असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

No comments: