Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 July, 2010

माशेलात मोलकरणीकडून ६.३३ लाखांची चोरी

सोने, ३ हजार युरो लंपास
फोंडा, दि.२३ (प्रतिनिधी): ख्रिश्चनवाडा माशेल येथील श्रीमती ऍना ज्यूड लोबो यांनी आपल्या घरात घरकामासाठी आणलेल्या एका युवतीने तिच्या घरातील सोने व रोख रक्कम मिळून ६ लाख ३३ हजार रुपये आणि ३ हजार युरो (विदेशी चलन) असा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.
ही घटना गुरुवार २२ जुलै २०१० रोजी घडली आहे. या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती ऍना लोबो या माशेल येथील महिला पणजी येथे काम करतात. २० जुलै २०१० रोजी त्यांनी पणजी येथून एका युवतीला आपल्या माशेल येथील घरी घरकामासाठी आणून ठेवले होते. घरकामाला ठेवण्यापूर्वी तिची कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यात आली नाही. घरात ठेवण्यात आल्यानंतर तिला पोलिस स्टेशनवर नेऊन माहिती घेण्याची तयारी लोबो कुटुंबीयांनी केली. त्यामुळे २२ जुलै रोजी सकाळी सदर युवतीने आजारी असल्याचे निमित्त करून ऍना यांच्या खोलीत दरवाजा बंद करून झोपण्याचे नाटक केले. सदर खोलीत असलेल्या कपाटात सोन्याचे दागिने, रोख रक्कम, विदेशी चलन होते. झोपण्याचा बहाणा करून तिने त्या खोलीतील कपाट उघडून आतील ऐवजाची चोरी करून पुन्हा कपाट बंद करून चावी मूळ जागी ठेवली. २२ रोजी दुपारी ऍना यांच्या घरी घरकाम करणारी नेहमीची कामवाली आल्यानंतर सदर घरकामासाठी आणलेली युवती जवळच्या दुकानात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली आणि पुन्हा परत आली नाही. जवळच्या दुकानात गेलेली सदर घरकामवाली युवती परत न आल्याने ऍना यांच्या कुटुंबीयांना संशय आला. ऍना संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्यांना घरकामवाली युवती गायब झाल्याची माहिती देण्यात आली. सदर घरकामवाली युवती खोलीत दरवाजा बंद करून झोपली होती, असेही सांगण्यात आले. त्यामुळे ऍना यांनी कपाट उघडून बघितले असता आतील सोन्याचे विविध प्रकारचे दागिने, रोख रक्कम आणि विदेशी चलन तीन हजार युरो चोरीस गेल्याचे आढळून आले. त्यानंतर ऍना लोबो यांनी फोंडा पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. ऍना लोबो यांना घरकामवाली युवती उपलब्ध केलेल्या पणजीतील एका घरकामवालीची जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली. मात्र, तिच्याकडून काहीच माहिती मिळू शकली नाही. सदर घरकामवाली युवतीचे पूर्ण नाव, छायाचित्र उपलब्ध नाही. त्या युवतीने आपले नाव नागम्मा एवढेच सांगितले होते. सदर युवती २५ ते ३० वयोगटातील असून वर्ण काळा, मध्यम बांधा आहे. सदर युवती हिंदी, कन्नड, तामीळ भाषा बोलते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्षी आमोणकर तपास करीत आहेत.

No comments: