Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 19 July, 2010

ड्रगप्रकरणी कडक कारवाईचे राहुल गांधींकडून आश्वासन

"एनएसयूआय'ने दिला अहवाल

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - ड्रग प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांच्या विरोधात सह्यांची मोहीम छेडणाऱ्या विद्यार्थी संघटनांची कशी सतावणूक केली जात आहे, याची सर्व माहिती कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांना देण्यात आली असून, त्यांनी यात लक्ष घालून कडक पावले उचलली जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आज सुनील कवठणकर यांनी दिली.
पोलिस जाणूनबुजून या प्रकारातील हवा काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण "सीबीआय'ला सोपवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दि. १६ जुलै रोजी दिल्ली येथे राहुल गांधी याची भेट घेऊन आल्यानंतर श्री. कवठणकर हे आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रीय प्रतिनिधी गौतम भगत व "एनएसयूआय'चे सरचिटणीस रुग्वेद आमोणकर उपस्थित होते.
गोव्यात कशा पद्धतीने पोलिस, राजकारणी आणि ड्रग माफिया एकत्र आले आहेत, याचा अहवालच श्री. गांधी यांना देण्यात आला आहे. तसेच, अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांचे ड्रग माफियांशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर सात पोलिसांना निलंबित करून अटक करण्यात आल्याचीही माहिती गांधी यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचे तपासकाम गुन्हा अन्वेषण विभाग कशा पद्धतीने गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहे, याचा संपूर्ण आलेख दिल्लीत सादर करण्यात आला आहे, असे श्री. कवठणकर यांनी सांगितले.
त्यामुळेच "एनएसयूआय' या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फतच केला जावा, अशीही मागणी त्यांनी श्री. गांधी यांच्याकडे करून गोव्यात सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेची माहितीही करून देण्यात आली. यावर त्या सह्या आणि निवेदन दिल्लीत पाठवून देण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली असल्याची त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अनेक प्रकरणात धाडसी निर्णय घेतले आहेत, त्यामुळे याही प्रकरणात ते असाच निर्णय घेऊन हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्या आरोपांवर ठाम
गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांवर आम्ही ठाम असून पोलिसांनी त्याच वेळी तपास केला असता तर, त्यांना पुरावेही सापडले असते, असा टोला श्री. कवठणकर यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी सुनील यांना गुन्हा अन्वेषण विभागाने जबानी नोंद करण्यासाठी बोलावून ड्रग आणि दहशतवादी यांचे कसे नाते आहे, त्यांच्यापर्यंत हा पैसा कसा जातो, तसेच या प्रकरणात कोण गुंतलेले आहेत, असे प्रश्न विचारले होते. त्यावेळी याच विभागातील एक पोलिस अधिकारी यात गुंतल्याचा दावा कवठणकर यांनी केला होता.

No comments: