Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 19 July, 2010

बेळगावमध्ये शंभर टक्के बंद

ठाकरे-अंतुले चर्चा

बेळगाव, दि. १८ - सीमाप्रश्नी कन्नड रक्षण वेदिकेने शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि भगवा ध्वज जाळल्याच्या निषेधार्थ विविध मराठी संघटनांनी पुकारलेल्या बेळगाव, निपाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज केंद्रीय मंत्री अ.र.अंतुले यांनी भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
शुक्रवारी संध्याकाळपासूनच शहर आणि परिसरात सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. आज बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
गेल्या आठ दिवसांपासून सीमाप्रश्नावरून सीमाभागात वातावरण तणावाचे असून, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या निंदनीय कृत्याविरोधात सीमाभागातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतानाच महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि इतर मराठी संघटनांनी बेळगाव बंदची हाक दिली होती. हा बंद दडपण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने काल संध्याकाळपासून बुधवार (ता. २१) संध्याकाळपर्यंत जमाव बंदी लागू केली आहे. तथापि, आज सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठेत, प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. परिवहन महामंडळाने शहरातील काही भाग वगळता अन्यत्र बससेवा बंद केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बंदच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलिस प्रमुख सोनिया नारंग स्वतः "बंद'वर नजर ठेऊन होत्या. तर मराठी संघटनांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी बंदचे आवाहन करत होते. दवाखाने, औषध दुकाने आदि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बहुतांशी बंद होते.
दरम्यान, बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी आज (रविवार) सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब ठाकरे यांच्या "मातोश्री' या निवासस्थानी झालेल्या ही बैठक दोन तास चालली. बैठकीत सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नावर चर्चा झाली. यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे उपस्थित होते.

No comments: