Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 22 July, 2010

'अखेर बालंट दूर झाले'

आयरिश प्रकरणी विश्वजित यांची प्रतिक्रिया
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश रॉड्रिगीस प्रकरणी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा हा उच्च न्यायालयाने अदखलपात्र ठरवल्याने आपल्यावरील बालंट दूर झाले आहे, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे. गेली तीन वर्षे या प्रकरणामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाळपई पोटनिवडणुकीत आता स्वच्छ उमेदवार म्हणून सामोरे जाण्यास आपण मोकळा झाल्याचेही ते म्हणाले.
आज येथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांना आपण चांगल्यापैकी ओळखतो. आपल्या वडिलांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. हे प्रकरण नेमके अचानक कसे काय तयार झाले, याचे आपल्याला कुतूहल आहे. आपला न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे व तो विश्वासच सार्थ ठरला. ऍड. शैलेंद्र भोबे व ऍड. सुशांत नाडकर्णी यांचे आपल्याला कायदेशीर सहकार्य लाभल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
या निकालामुळे आपल्यावरील आरोपपत्र निकालात काढण्यात येईल, असाही दावा त्यांनी केला. दरम्यान, भारतीय दंड संहितेचे कलम ५०६ हे दखलपात्र करण्याची शिफारस खुद्द माजी मुख्यमंत्री तथा सभापती प्रतापसिंग राणे यांनीच काही काळापूर्वी केली होती, असे काही पत्रकारांनी विचारले असता, मागील स्मृतींना उजाळा देण्याची आपली इच्छा नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
ऍड. आयरिश यांच्याशी आपले कधीच वैर नव्हते व यापुढेही राहणार नाही, असे सांगून हे प्रकरण आपल्या दृष्टीने संपले आहे, असे त्यांनी शेवटी नमूद केले.

No comments: