Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 April, 2010

निष्पाप लोकांना चिरडून खनिज वाहतूक नकोच

विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचा इशारा
सावर्डे, दि. ५ (प्रतिनिधी): राज्यातील खनिज वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून सांगे, केपे तालुक्यातील वाहतूक नियंत्रणाबाहेर गेली आहे. आपण सरकारचा घटक नसलो तरी स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळाल्यास बेदरकार वाहतूक नक्कीच नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. खाण हा येथील प्रमुख व्यवसाय असला तरी निष्पाप लोकांना चिरडून तो करू देणार नाही, असा जोरदार इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला. कुडचडे येथे आयोजित खनिज वाहतूक बंद आंदोलनाला संबोधित करताना श्री. पर्रीकर यांनी खनिज वाहतूक १० एप्रिलपर्यंत तात्पुरती बंद ठेवून येत्या तीन दिवसांत वरिष्ठ सरकारी अधिकारी, खाण व्यावसायिक, वाहतूक कंत्राटदार व नागरिकांनी मिळून ही समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. स्थानिक आमदार श्याम सातार्डेकर व बाबू कवळेकर यांनी या आंदोलनात सहभागी होताना या वाहतूक बंदला पूर्ण पाठिंबा जाहीर करून सरकारला एकप्रकारे घरचा आहेर दिला.
३१ मार्च रोजी खनिज ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सतीश रिवणकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी येथील खनिज वाहतूक कायमची बंद करण्याची जोरदार मागणी केली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ एप्रिलपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली होती. आज ५ रोजी येथील खनिज वाहतूक कायमची बंद करण्याच्या उद्देशाने स्थानिकांनी वाहतूक बंदची हाक दिली होती. या आंदोलनाचा सुगावा लागल्याने सांगे केपे तालुक्यातील खनिज वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय खनिज कंपन्या व वाहतूक कंत्राटदारांनी घेतल्याने आजही केपे सांगे मार्गावर वाहतूक झाली नाही.
या आंदोलनानिमित्त सकाळी ७.३० वाजल्यापासूनच केपे, तिळामळ, कुडचडे येथील स्थानिकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरण्याची तयारी केली होती. यानंतर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर अपघात झालेल्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी खनिज वाहतूक समस्येवर चर्चा केली. यावेळी माजी आमदार विनय तेंडुलकर, ऍड. नरेंद्र सावईकर, ऍड. डॉम्निक फर्नांडिस, कुडचडेचे नगराध्यक्ष मारुती नाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी स्थानिक आमदार श्याम सातार्डेकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन उपस्थितांशी चर्चा केली.
स्थानिक कॉंग्रेस आमदारांचे सहकार्य मिळाल्यास येथील खनिज वाहतुकीवर तोडगा काढणे शक्य असल्याचे यावेळी श्री. पर्रीकर यांनी सांगितले. १० एप्रिलपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवण्यासाठी खनिज कंपन्या, वाहतूक कंत्राटदार व ट्रकमालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रकांची संख्या, त्यांना वेळेचे बंधन घालणे, त्यांची माल नेण्याची क्षमता ठरवणे या संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाहतुकीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्याचे आश्वासन श्री. पर्रीकर यांनी उपस्थितांना दिले.
घोड्याला पाण्याजवळ नेणे, त्याचे तोंड पाण्यात बुडवणे शक्य आहे. परंतु, तो पाणी पितो की नाही, हे समजणे कठीण आहे, अशा शब्दात विद्यमान सरकारवर टीका करताना श्री. पर्रीकर यांनी स्थानिकांची बगलरस्त्याची मागणी सरकार पूर्ण करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी श्याम सातार्डेकर यांनी बगलमार्गासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे सांगताना संबंधित सरकारी अधिकारी यात रस घेत नसल्याची खंत व्यक्त केली. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना अनेक कठीण कामे त्यांनी पूर्ण केल्याचे सांगून विद्यमान सरकारने गेल्या अडीच वर्षांत केवळ एकाच टप्प्यातील रस्त्याच्या कामाची निविदा काढली असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बाबू कवळेकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. बगल रस्त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळातर्फे २८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती देताना बगलरस्त्याची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनावेळी मोकळ्या शेतात सुमारे १ हजार नागरिक जमले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, मामलेदार सुदिन नातू, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, उप अधीक्षक महेश गावकर, रोहिदास पत्रे, पोलिस निरीक्षक भानुदास देसाई, सुदेश नार्वेकर, राजू राऊत देसाई घटनास्थळी हजर होते. यावेळी पुरुष व महिलांची प्रत्येकी एक राखील दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती, शिवाय केपे, काणकोण, कुडचडे, सांगे पोलिस उपस्थित होते.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या खनिज वाहतूक बंदला कंत्राटदार, ट्रक मालकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होत असून साधनसुविधा नसल्यास नव्या ट्रकांची नोंदणी ताबडतोब बंद करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. एवढे दिवस स्वयंस्फूर्तीने वाहतूक बंद ठेवली, आता १० पर्यंत वाहतूक बंद ठेवणे म्हणजे आम्हांवर अन्याय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

No comments: