Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 9 April, 2010

अशोक भोसले विरोधातील तक्रारीची फेरचौकशी करा

न्यायालयाचे आदेश

फोंडा, दि.८ (प्रतिनिधी)- जय दामोदर संघटनेचे अध्यक्ष महेश नायक यांनी वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक अशोक भोसले यांच्या विरोधात फोंडा पोलिस स्थानकावर दाखल केलेल्या एका तक्रारीच्या संदर्भात फोंडा पोलिसांनी केलेल्या चौकशी कामाबद्दल येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आहे. या तक्रारीची सखोल, संपूर्ण अशी फेरचौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
मडगाव येथील महेश नायक यांनी वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक अशोक भोसले यांच्या विरोधात एक तक्रार येथील फोंडा पोलिस स्टेशनवर दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर फोंडा पोलिसांनी ३ डिसेंबर २००८ रोजी अशोक भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. महेश नायक यांनी अशोक भोसले यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा आरोप तक्रारीत केलेला आहे. फोंडा वाहतूक कार्यालयाचे प्रमुख अधिकारी म्हणून कार्य करताना श्री. भोसले यांनी योग्य कागदपत्रे नसताना अनेक वाहनांची नोंदणी करून घेतली आहे. अशा प्रकारच्या ह्या वाहनांचा समाज विघातक कृत्यांसाठी वापर होऊ शकतो, असे महेश नायक यांचे म्हणणे आहे.
या तक्रारीची चौकशी फोंडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन लोकरे यांनी केली. या तक्रारीच्या संदर्भात फोंडा पोलिसांनी "सी समरी' तयार करून न्यायालयाला सादर केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यात आला. मात्र, त्यात दखलपात्र गुन्हा आढळून आला नाही. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत तथ्य नाही. सरकार किंवा तक्रारदाराला कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तक्रारदाराने गैरसमजातून तक्रार दाखल केली. त्यामुळे "सी समरी'ला मंजुरी द्यावी, अशी याचना न्यायालयाकडे करण्यात आली होती.
या संदर्भात न्यायालयात युक्तिवाद झाला. महेश नायक यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले. या तक्रारीची योग्य प्रकारे चौकशी करण्यात आलेली नाही, असे न्यायालयाने निवाडा देताना नमूद केले. या तक्रारीची गांभीर्याने व सखोल चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून पोलिसांना "सी समरी' नाकारण्यात आली आहे.

No comments: