Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 7 April, 2010

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ७३ जवान शहीद

१ हजार नक्षलवाद्यांचा हल्ला
मुकराना जंगलातील घटना
'ऑपरेशन ग्रीन हंट'चा बदला

रायपूर, दि. ६ : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील मुकराना जंगलात आज सकाळी सहा ते सातच्या सुमारास जवळपास एक हजारावर नक्षलवाद्यांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ७३ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासातील नक्षलवाद्यांचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने केंद्र तसेच राज्य सरकार हादरले आहे. या हल्ल्यातील बळीसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माओवाद्यांच्या विरोधात कारवाई प्रारंभ करण्यासाठी रस्ता मोकळा करून परतणाऱ्या सीआरपीएफ तसेच राज्य पोलिस मिळून ८० वर जवानांचा समावेश असलेल्या तुकडीवर मुकराना जंगल परिसरात आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला. शहीद झालेल्यांत सीआरपीएफच्या एका डेप्युटी तसेच असिस्टंट कमांडंटसह ७२ जवानांचा तसेच एका जिल्हा पोलिस हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
यासंदर्भात माहिती देताना दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक अमरेश मिश्रा यांनी सांगितले की, माओवाद्यांनी प्रथम सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारे एक वाहन दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतालनर-तारमेटला खेड्याजवळ उडवून लावले. स्फोटकांच्या साह्याने वाहन उडवून लावल्यानंतर लगेचच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी (सीआरपीएफ) तसेच राज्य पोलिसांनी प्रत्युत्तरासाठी प्रयत्न सुरू करताच शेकडोंच्या संख्येत आलेल्या माओवाद्यांनी जवळच्याच टेकड्यांचा आश्रय घेत या जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास प्रारंभ केला. माओवाद्यांच्या विरोधात अभियान चालविण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सीआरपीएफचे पथक तारमेटला जंगलात तळ ठोकून होते.
महानिरीक्षक आर. के. विज यांनी सांगितले की, घटनास्थळावरून सीआरपीएफच्या ७२ जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पेरून ठेवलेल्या अतिशक्तिशाली स्फोटकांचा माओवाद्यांनी स्फोट घडवून आणताच त्यात भूसुरूंगविरोधी वाहन सापडून वाहनचालक ठार झाला. यानंतर सीआरपीएफचे जवान व माओवादी यांच्यात लगेच जोरदार चकमक सुरू झाली. या चकमकीत जखमी झालेल्या आठ जवानांना वैद्यकीय उपचारासाठी लगेच इस्पितळात हालविण्यात आले आहे, असे विज यांनी सांगितले.
या घटनेचे वृत्त कळताच सीआरपीएफचे महासंचालक विक्रम श्रीवास्तव राजधानी दिल्लीतून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीआरपीएफचे जवान आपल्या कामगिरीवर असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आहे. ही एक मोठी दुर्दैवी व दु:खदायक घटना आहे, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनीही या घटनेची तातडीने दखल घेऊन आपल्या वरिष्ठ पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यात या घटनेची माहिती तर घेतलीच, परंतु पुढे माओवाद्यांच्या विरोधात मोहिमा राबविताना काय खबरदारी घ्यावयाची यावर चर्चा केल्याचे समजते. या घटनेने माओवाद्यांचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री रमणसिंह यांनी व्यक्त केली आहे.
सीआरपीएफचे विशेष महासंचालक तसेच नक्षलवादविरोधी कृती दलाचे कमांडर असलेले विजय रमण घटनास्थळी दाखल झाले आहेत. ज्या भागात ही घटना घडली आहे त्या भागात अतिरिक्त दले रवाना करण्यात आली असून हल्लेखोर माओवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात जखमी तसेच शहीद झालेल्या जवानांना तेथून माघारी आणण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर केला जात आहे, असे छत्तीसगडचे पोलिस महासंचालक विश्वरंजन यांनी सांगितले. जखमी जवानांना वैद्यकीय उपचारासाठी माघारी आणण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून शहीद जवानांचे मृतदेहही माघारी आणले जात आहेत.
दोनच दिवसांपूर्वी ओरिसातील कोरापूत जिल्ह्यात माओवाद्यांनी एका भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता व त्यात नक्षलवादविरोधी विशेष पथकातील ११ जवान शहीद झाले होते. १५ फेब्रुवारी रोजी प. बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात "ईस्टर्न फ्रंटियर रायफल्स'चे २४ जवान शहीद झाले होते तर जून २००८ मध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात आंध्रप्रदेश पोलिस दलातील ग्रेहाऊंड कमांडोजचे ३८ जवान ओरिसातील कारवाईत शहीद झाले होते. गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६ पोलिस शहीद झाले होते.

No comments: