Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 April, 2010

गोमंतक मराठा समाजाच्या अध्यक्षपदी सुभाष साळकर

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गोमंतक मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत समाजाचे माजी अध्यक्ष प्राचार्य सुभाष तुकाराम साळकर यांची समाजाच्या अध्यक्षपदी एकमताने नव्याने निवड करण्यात आली आहे.
ऍड. महेश आमोणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदावर प्राचार्य साळकर यांची गेल्या रविवारी झालेल्या सभेत निवड करण्यात आली. प्रा. साळकर यांनी २००२ ते २००५ पर्यंत गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच समाजातर्फे साजऱ्या करण्यात आलेल्या भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी वर्ष समारोह समितीचेही ते अध्यक्ष होते.
सर्वसाधारण सभेत अध्यक्षांच्या निवडी व्यतिरिक्त इमारतीची वातानुकूलन यंत्रणा, गच्चीवरील फॅब्रिकेशनचे काम, २०१०-२०११ चे अंदाजपत्रक, मळा पणजी येथील संस्थेची सेवा सदनची जागा, डिचोलीतील संस्थेच्या मालकिच्या जागेत प्रकल्प उभारणे तसेच पहिल्या मजल्यावरील समाज धुरिणांची चित्रे राजाराम स्मृती सभागृहात हलविणे यासारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
प्रा. साळकर यांनी आपल्या भाषणात बांदोडकर जन्मशताब्दी वर्ष समारोहाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सर्वांसमोर ठेवली. त्यानिमित्ताने गोमंतक मराठा समाजाची खानेसुमारी पूर्ण करणे, युवा मेळावा, महिला सबलीकरण, समाजातील क्रीडापटूंचे एकत्रीकरण, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा यासारखे कार्यक्रम वर्षभर घेण्यात येणार आहेत.

No comments: