Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 9 April, 2010

महानंदवर आरोप निश्चित

अंजनी गावकर खूनप्रकरण
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- तरवळे शिरोडा येथील सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक (४१) याच्याविरुद्ध उत्तर गोवा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी आज आणखी एका प्रकरणात आरोप निश्चित केले. ऑगस्ट २००५ साली गवळवाडा निरंकाल फोंडा येथील अंजनी गावकर या तीस वर्षीय तरुणीचा महानंदने ओपा खांडेपार येथे दुपट्ट्याने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध भादंसं ३६३ (अपहरण करणे), ३०२ (खून), ३९२ (मौल्यवान वस्तूंची चोरी), २०१ (पुरावा नष्ट करणे) या कलमांखाली गुन्हे निश्चित करण्यात आले आहेत. आरोपीतर्फे ऍड. एम. डिसोझा तर फोंडा पोलिसांतर्फे सरकारी वकील सुभाष देसाई बाजू मांडत आहेत.
अंजनी गावकर हिच्या भावाने ८.५.२००९ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार ती वरचा बाजार फोंडा येथे एका टेलरींग दुकानात काम करत होती. तरवळे-शिरोडा येथील महानंदसोबत तिचे मित्रत्वाचे संबंध होते. तो तिला वारंवार शेजाऱ्याच्या घरात भेटत असे. ३१.८.२००५ रोजी सकाळी ७ वाजता घरातून बाहेर पडलेली अंजनी संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. याच दिवशी तिच्या कपाटातून सोन्याच्या बांगड्या, हार, सोनसाखळी, अंगठी मिळून सुमारे ७५ हजार रुपयांचे दागिने व रोख १० हजार गायब झाले होते. ८.५.२००९ रोजी महानंदने अंजनीला ओपा खांडेपार येथे नेऊन दागिन्यांसाठी तिचा खून केल्याचे फोंडा पोलिस स्थानकात कबूल केले होते. नंतर ते दागिने एका सोनाराला विकल्याचे त्याने सांगितले होते.

No comments: