Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 10 April, 2010

नार्वेकर यांची उलट तपासणी

निवडणूक प्रचार खर्च
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): निवडणूक प्रचारासाठी भरमसाठ खर्च करूनही त्याचा हिशेब दाखवण्यात आलेला नसल्याने थिवी मतदारसंघाचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांना अपात्र ठरवावे, असा दावा करून त्यांच्या प्रतिस्पर्धी फर्मिना खंवटे यांनी सादर केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी आमदार नार्वेकर यांची आज उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून याचिकादाराच्या वकिलाने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मिस्कीलपणे उत्तरे दिली.
निवडणुकीच्या काळात काढण्यात आलेल्या रॅलीसाठी मी कोणताही खर्च केलेला नाही. तसेच मी रॅलीमध्ये सामील झालेल्या लोकांना जेवण किंवा पेट्रोलचाही खर्च दिलेला नाही, असे श्री. नार्वेकर यांनी उलट तपासणीत सांगितले. मी रॅलीसाठी किंवा रॅलीच्या दिवशी एकही पैसा खर्च केलेला नाही, असेही ते म्हणाले. यावेळी याचिकादाराने, तुम्ही गेल्यावेळी रॅलीसाठी २० हजार रुपये खर्च केल्याचे म्हटले होते, याची आठवण त्यांना करून दिली असता श्री. नार्वेकर यांनी सदर २० हजार रुपये टी-शर्टचे बिल भरण्यासाठी खर्च केल्याचे सांगितले. ते बिल आपल्याला दि. १८ रोजी देण्यात आले होते. तुम्ही ही रक्कम तुमच्या निवडणूक खर्चात का दाखवली नाही, असा प्रश्न केला असता, मी ते पैसे रॅलीसाठी खर्च केले नाही, त्यामुळे ते खर्चात दाखवले नाही, असे ते म्हणाले.
तुमच्या कार्याची समितीने काढलेली "सीडी' रॅलीत दाखवण्यात आली होती का, असा प्रश्न केला असता, मी कोणताही "सीडी' पाहिलेली नाही, असे उत्तर त्यांनी दिले. तुमच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त काढलेली "सीडी' तुम्ही का पाहिली नाही असे विचारले असता, मी समितीकडे "सीडी' मागितली नाही. माझा वाढदिवस दि. ११ फेब्रुवारीला झाला आणि समितीने "सीडी'चे काम दि. १६ एप्रिल रोजी २००७ रोजी पूर्ण केले, असे श्री. नार्वेकर म्हणाले. याविषयीची पुढील उलटतपासणी येत्या १६ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

No comments: