Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 7 April, 2010

२०११ पर्यंत बगलमार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न : पर्रीकर

कुडचड्यातील खनिज वाहतूक १० पर्यंत बंद
सावर्डे, दि. ६ (प्रतिनिधी): केपे-कुडचडे येथील खनिज वाहतूक १० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याची अधिसूचना दक्षिण गोवा जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी जारी केली आहे. ११ रोजी वाहतूक सुरू झाल्यानंतर पुढील कृती ठरवण्यात येणार असून २०११ पर्यंत बगलमार्ग तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कुडचडे येथे दिली. केपे-कुडचडे-सावर्डे भागातील खनिज वाहतुकीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कुडचडे येथील चंद्रभागा तुकोबा हायस्कूलच्या सभागृहात बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला कुडचड्याचे आमदार श्याम सातार्डेकर, सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, ऍड. नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष मारुती नाईक, मार्टिन मिनीन आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. पर्रीकर यांनी सांगितले की, केपे, सांगे, कुडचडे व सावर्डे भागात गेल्या दोन वर्षांपासून वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. ३१ मार्च रोजी सतीश रिवणकर यांचा खनिज ट्रकाखाली सापडून मृत्यू झाला होता. चीनमधून खनिजाची मागणी वाढल्याने येथील खाण व्यवसायाला ऊत आला आहे. ट्रक मालक आपले हप्ते कसे भरणार याचा विचार करत आहेत. मी ट्रक मालकांच्या पूर्णपणे विरोधात नाही. पण येणाऱ्या १०-२० वर्षांत आगामी पिढीला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल, याचा विचार त्यांनी करणे आवश्यक आहे. खनिजाला जोवर मागणी आहे तोवर ठीक आहे पण मागणी बंद झाल्यावर काय? याचा विचार ट्रक मालकांनी केला पाहिजे. या दृष्टिकोनातून शून्य ट्रक हा उपाय नसून खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता हाच योग्य उपाय असल्याचे श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात या भागातील खनिज व्यवसायात प्रचंड वाढ होणार असून त्या दृष्टीने साधनसुविधा तयार करण्याची तीव्र आवश्यकता आहे. यामुळे या ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या बगलमार्गावर एकही घर नसेल, याची काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी श्याम सातार्डेकर यांनी सदर बगलमार्गासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यासाठी निविदा जारी केल्याचे सांगितले. या बैठकीला सांगे, केपे तालुक्यातील सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते. यावेळी विठ्ठल आवंदियेकर, रायसू नाईक, आशिष करमली, एकनाथ नाईक, सुभाष फळदेसाई यांनी आपल्या सूचना मांडल्या.

No comments: