Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 7 April, 2010

बोला चिदंबरमजी, भ्याड कोण? सच्चिदानंद शेवडे

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला पाहता केंद्रीय गृह खात्याच्या अकलेचे जाहीर अभिनंदन करायला हवे. नक्षलवादी भ्याड आहेत असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटल्याच्या वृत्ताची शाई वाळण्यापूर्वीच काल छत्तीसगडमधील दंतेवाड्यात काही तासांत शंभर जवानांचे मुडदे पडले. त्यावर पडीक चेहऱ्याने चिदंबरम म्हणाले, "काही तरी गंभीर चूक घडली असावी'. नक्षलवाद्यांनी जवानांना जाळ्यात पकडले याला अकलेचे दिवाळे म्हणावे की जबाबदारी झटकण्याचा बेफिकीरपणा? तुम्हीच कडेकोट बंदोबस्तात नक्षलवाद्यांच्या प्रदेशात जाऊन ते भ्याड असल्याची गर्जना केलीत ना? हल्ला हा सांगून किंवा वाजत गाजत होत नसतो एवढे भानही तुम्हाला राहिले नाही. शत्रू हा नेहमी जाळेच पसरतो. पाय रुतण्याइतके गालिचे नव्हे, हे कधी समजणार? आता कितीही कपाळ बडवले तरी ते फुटणारच! कितीही कंठशोष केलात तरी निरपराध जवानांचे प्राण परतून येणार नाहीत! अजून किती काळ हा जीवघेणा खेळ खेळणार आहात? राजकारण्यांचा खेळ होतो पण जनतेचा जीव जातो त्याचे काय?
आज नरकात खितपत पडलेले कनू संन्याल व मुजुमदारांचे आत्मे यातना सहन करीत असतानाच खदाखदा हसले असतील; त्यांनी लावलेल्या या विषवृक्षावर वेळीच घाव घातला गेला नाही म्हणून सुखावले असतील. जवानांच्या हत्या काश्मिरात, ईशान्य भारतात व नक्षली भागात रोजच सुरू असतात. वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या वाचून आपली मने बधिर बनली आहेत का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आता मेणबत्त्या लावणारे हात नव्हे तर नाकर्त्या राजकारण्यांचा निषेध जमेल त्या मार्गाने करणारे हात हवेत. देशाच्या शत्रूच्या उरात धडकी भरवणारे हात हवेत!
महाराष्ट्रात गडचिरोली भागात पोलिसांना मारून त्यांचे रक्त पिण्यात आले होते. तेव्हासुद्धा नक्षलवाद्यांचा फक्त निषेध झाला होता. शस्त्रे उचलून स्वदेशींना मारणारी ही वाट चुकलेली कोकरे नव्हेत, तर हे रक्तपिपासू पिसाळलेले लांडगे आहेत. शस्त्राला शस्त्रानेच उत्तर द्यावे लागते. अहिंसेच्या क्लोरोफॉर्ममधून त्यासाठी बाहेर यायला हवे आणि कठोरपणे यांचा निःपात करायला हवा. अन्यथा निष्पाप बाप, भाऊ, मुले, माता, भगिनी यांचा कत्तल होतच राहील. बंडाळीसाठी चीन जेवढा कठोरपणा दाखवतो तेवढा दाखवायला हवा. चिदंबरमजी, खरेच भ्याड नक्की कोण हे एकदा सांगून टाका. जिवाची पर्वा न करता अमानुष कत्तली करणारे नक्षली की कडेकोट बंदोबस्तातून फिरणारे तुमच्यासारखे नेते? ऑपरेशन "ग्रीन हंट' आता "रेड हंट' बनल्याची जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा देणार की तीव्र निषेधाची पोकळ किंकाळी ठोकून गप्प बसणार?
-डॉ. सच्चिदानंद शेवडे

No comments: