Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 4 April, 2010

दामबाब व केरीच्या आजोबाला मलेरिया सर्वेक्षकांचे साकडे..!

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): केवळ आपल्या मर्जीतील लोकांना सामावून घेण्यासाठी गेली पंधरा वर्षे सरकारी सेवेत असलेल्या मलेरिया सर्वेक्षकांना अचानकपणे नोकरीवरून काढून टाकण्याचा सरकारच्या निर्णयाचा निकाल आता प्रत्यक्ष देवाच्या दरबारातच व्हावा, अशी प्रार्थना या कामगारांनी आरंभली आहे. सुमारे ७४ कुटुंबीयांना अशा प्रकारे या सरकारने मरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले आहे. गेले पंधरा दिवस हे कामगार उपोषणाला बसले आहेत. त्यांना न्याय देणे सोडाच, पण त्यांची साधी विचारपूस करण्याची तसदीही मुख्यमंत्री वा आरोग्यमंत्री घ्यायला तयार नाहीत. या कामगारांची दयनीय स्थिती बनली आहे. जनतेचे पालक असलेल्या सरकारने दाखवलेल्या अनास्थेने गर्भगळीत झालेल्या या कामगारांनी त्यामुळेच आता दिगंबर कामत यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री दामबाब व विश्वजित राणेंच्या सत्तरीचा राखणदार असलेला श्री देव आजोबा यांना साकडे घातले आहे. माणसांनी वाऱ्यावर सोडलेल्या या कामगारांना आता त्यांच्या दैवतांनीच आधार द्यावा, अशी करूण याचना हे कामगार भाकत आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सत्तरीच्या लोकांची भरती करण्यासाठी या कामगारांना नोकरीवरून काढले, पण मुख्यमंत्री या नात्याने या कामगारांवर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी कामत यांनी घेण्याची गरज होती.
मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडून सुरू असलेल्या आश्वासनांच्या टोलवाटोलवीमुळे या कामगारांची जीवघेणी फरफट सुरू आहे. या दोघांपैकी कोण खरे आणि कोण खोटे याचा निवाडा करण्याचेही त्राण या कामगारांत आता राहिलेले नाहीत. कामगारांना भोगाव्या लागत असलेल्या या मरणयातना व त्यातून निर्माण होणारे तळतळाट सरकारला भोवू नयेत, अशी इच्छा या कामगारांनी व्यक्त केली. श्री दामबाब व श्री देव आजोबा यांनीच आता आमच्या मदतीला धावून यावे व मरणयातनेतून सुटका करावी, अशी कळकळीची प्रार्थना कामगारांनी केली आहे.

No comments: