Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 4 April, 2010

'एमपीटी'ची विक्रमी मालहाताळणी

बंदर आधुनिकीकरणाची भव्य योजना : प्रवीण अगरवाल
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): मार्मगोवा पोर्ट ट्रस्ट म्हणजेच "एमपीटी' ने यंदाच्या वर्षांत विक्रमी ४८.८५ दशलक्ष टन माल वाहतुकीची हाताळणी केली आहे. या माल वाहतूक हाताळणीत सर्वांत महत्त्वाचा वाटा हा लोह खनिज निर्यातीचा असून यंदा ४०.३ दशलक्ष टन लोह खनिज निर्यात झाल्याची नोंद बंदराकडे झाली आहे. "एमपीटी' बंदर हे देशातील अग्रगण्य बंदरांपैकी सातव्या क्रमांकावरचे म्हणून नावारूपास येत आहे व पुढील चार वर्षांत सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करून या बंदराचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा बंदराचे अध्यक्ष प्रवीण अगरवाल यांनी केली.
"एमपीटी'बंदराच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज येथील मांडवी हॉटेलमध्ये बोलावण्यात आलेल्या खास पत्रकार परिषदेत बंदराचे अध्यक्ष प्रवीण अगरवाल यांनी यासंबंधी विस्तृत माहिती पत्रकारांसमोर ठेवली.यंदा बंदराचे वार्षिक उत्पन्न ३२४ कोटी रुपयांवर पोहोचले. बंदर कामगारांना वेतनवाढ व थकबाकीवर सुमारे ४२.११ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने खर्चाचा आकडा ३३२ कोटी रुपयांवर पोहचला व त्यामुळे आर्थिक अंदाजपत्रकात आठ कोटी रुपयांची तूट नोंद झाली आहे. ही तूट नाममात्र असून ती लवकरच भरून काढली जाईल. कामगारांच्या वेतनवाढीचा खर्च हा पूर्णतः बंदराच्या अंतर्गत उत्पन्नातूनच करण्यात आला व त्यासाठी कर्ज घेण्याची नामुष्की ओढवली नाही, अशीही माहिती यावेळी श्री. अगरवाल यांनी दिली.
"एमपीटी' ने अधिसूचित केलेल्या कार्यक्षेत्राबाबतचा मुद्दा राज्य सरकारने मान्य केला आहे; मात्र या कार्यक्षेत्रात बदल करण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे सुरू असल्याचेही आपल्याला समजले असल्याचे ते म्हणाले. बंदराच्या पुढील चार वर्षांसाठीच्या विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी आहे. या विस्तार प्रकल्पात राज्य सरकारने केलेल्या शिफारशी व सूचनांची दखल घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
चीनमध्ये खनिजाला वाढती मागणी असल्याने यंदा मुरगाव बंदरातून सुमारे ४०.५७ दशलक्ष टन लोह खनिजाची निर्यात करण्यात आली. देशातील एकूण लोह खनिज निर्यातीत ३५ टक्के वाटा हा गोव्याचा आहे. राज्य सरकारने अतिरिक्त शंभर नव्या खाणींना मान्यता दिल्याची माहिती त्यांना दिली असता या खनिजाची हाताळणी करण्याची क्षमता बंदराकडे आहे, मात्र त्यासाठी राज्यातील अंतर्गत जलमार्गांच्या विकासाचा विचार करण्याची गरज भासणार आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
या आर्थिक वर्षांत बंदराने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीत २१ जानेवारी २०१० रोजी २.८२ लाख टन कार्गो मालाची हाताळणी करण्याचा विक्रम नोंदवला.२२ फेब्रुवारी २०१० रोजी १८९३६ टन वाफीत कोळसा हाताळण्यात आला.यावर्षी एकूण १९ क्रुझ जहाजे बंदरावर नांगरण्यात आली. त्यात १०८७८ प्रवाशांचा समावेश होता.बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांत आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनस,अतिरिक्त तीन मुरींग डॉल्फिन्स,कोळसा हाताळणी टर्मिनलचा विकास,लोह खनिज हाताळणी टर्मिनस, वर्णापुरी ते पोर्ट दरम्यान, चौपदरीकरण,जेटी, यांत्रिक खनिज हाताळणी प्रकल्प आदींचा समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प "पीपीपी'पद्धतीवर राबवण्यात येणार आहे व काही प्रकल्पांसाठी बॅंकांमधून पैसे घेण्यात येणार आहेत. पर्यावरण व्यवस्थापनाबाबत बंदर व्यवस्थापनाकडून सतर्कता बाळगण्यात येते व पुढील चार वर्षांत बंदराचा विकास हा पर्यावरणाच्या संरक्षणाला नजरेत ठेवूनच नियोजन केलेला आहे,असेही ते म्हणाले. खारीवाडा जेटीचा विषय निकालात निघाला आहे व तिथे लवकरच नवीन जेटीचे काम सुरू होईल,असेही श्री.अगरवाल म्हणाले.
या पत्रकार परिषदेला बंदर व्यवस्थापनाचे सर्व विभाग प्रमुख हजर होते.

No comments: