Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 5 April, 2010

पाकमधील ख्रिश्चनांबद्दल चिंता

धर्मगुरूंकडून बालशोषणाचा मुद्दा पोप यांच्या संदेशात दुर्लक्षित

रोम, दि. ४ - उच्च पदावरील काही ख्रिस्ती धर्मगुरुंवर बालशोषणाचे गंभीर आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर "ईस्टर' निमित्त रोमन कॅथलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप बेनेडिक्ट(सोळावे) यांच्या संदेशाकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते, तथापि मुस्लिम देशांतील विशेषतः पाकिस्तानमधील ख्रिश्चनांच्या सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त करण्यावरच त्यांनी भर दिला. "आपल्या विशिष्ट श्रद्धेपायी पाकिस्तानमध्ये ख्रिश्चनांना छळवणुकीला आणि काही वेळा मृत्युलाही सामोरे जावे लागत आहे, हे वेदनादायी आहे,'असे पोप यांनी म्हटले आहे. बालशोषणाचा मुद्दा त्यांनी दुर्लक्षिल्यामुळे जगभरात या संदेशाबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पोप यांच्या संदेशापूर्वी व्हेटिकन कॉलेज ऑफ कार्डिनल्सचे डीन आंजेलो सोदानो यांनी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांच्या मेळाव्याला उद्देशून बोलताना, काही धर्मगुरुंविरुद्ध संशयाचे वातावरण पसरवून समुदायाबद्दल गैरसमज पसरविले जात असले तरी जगातील सारा ख्रिश्चन समुदाय पोप यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. अशा प्रकारे एका धर्मुगुरूने पोप यांच्या संदेशापूर्वी बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. धर्मगुरुंकडून होणाऱ्या बालशोषणासंबंधात जगात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांची दखल घेत कार्डिनल सोदानो यांनी हे भाषण केल्याचे मानले जाते. यापूर्वी युरोपमधील बिशपांनी अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मगुरुवर बालशोषणाचा गंभीर आरोप असूनही कार्डिनल त्यांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. बेल्जियम आणि जर्मनीतील बिशपांनी "चर्च'च्या यासंबंधातील निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.असे असूनही पोप बेनेडिक्ट सहावे यांनी आपल्या संदेशात या गंभीर प्रकाराचा उल्लेखही केला नसल्याबद्दल समुदायाच्या अनेक घटकांकडून खेद व्यक्त केला जात आहे.

No comments: