Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 April, 2010

जी-७ गटाला ठेंगा

राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): जी-७ गटाने ठेवलेल्या अव्यवहार्य प्रस्तावाला कॉंग्रेस श्रेष्ठींनी ठेंगाच दाखवल्यात जमा असल्याने या गटाची पूर्णपणे नाचक्की झाली आहे. या गटाचा प्रस्ताव कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर घेऊन गेलेल्या केंद्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनीही आता अंग काढून घेण्याचे प्रयत्न चालवल्याने हा गट अधिकच तोंडघशी पडला आहे. कॉंग्रेसच्या या कृतीविरोधात खवळलेल्या या नेत्यांनी कॉंग्रेसला धडा शिकवणारच या निर्धाराने रात्री उशिरापर्यंत मुंबईत खलबते सुरू ठेवली होती, पण नेमके काय करावे हेच त्यांना आता समजत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे.
दरम्यान, जी-७ गट मुंबईला आहे याची खबर असूनही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी उद्या सकाळी १० वाजता तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावून या गटाला एकप्रकारे आव्हानच दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्याच्या बैठकीसमोर नाममात्र क्रीडा धोरणासंबंधीचा विषय ठेवण्यात आला आहे. या बैठकीला जी-७ गटातील पाच मंत्री उपस्थित राहू शकणार नाही, हे माहीत असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्यांनी उघडपणे या गटाचे आव्हान स्वीकारले आहे, असेही बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला आता जी-७ गट कोणत्या पद्धतीने उत्तर देतो हे पाहणेच उत्सुकतेचे ठरणार आहे. आपल्या प्रस्तावाबाबत आज निर्णय होईल, या आशेने मुंबईत तळ ठोकून बसलेल्या जी-७ गटाकडे आज खुद्द त्यांच्याच श्रेष्ठींनी पाठ फिरवली. राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची भेटच होऊ शकली नसल्याने हे नेते वाऱ्यावरच पडले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्याशी उद्या ६ रोजी बैठक घेण्याचे ठरले आहे, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकाराअंतर्गत वाद आता अधिकच उफाळून आला आहे. राष्ट्रवादी, मगो व अपक्ष अशा आघाडीतील कॉंग्रेसेतर नेत्यांनी जी-७ नावाखाली तयार केलेल्या गटाने कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर ठेवलेला प्रस्ताव धुडकावल्यात जमा आहे. या गटाच्या दबावतंत्राला आता कोणत्याही परिस्थितीत भीक घालायची नाही, असा निर्धारच श्रेष्ठींनी राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना कळवला आहे. कॉंग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे जी-७ गटाचीही त्रेधातिरपीट उडाली आहे. आता कोणत्या तोंडाने हात हालवत परतणार या विवंचनेत हे नेते आहेत. दरम्यान, या गटाने ठेवलेल्या प्रस्तावावर आज अंतिम निर्णय कळवणार, असे वचन कॉंग्रेस श्रेष्ठींनी या गटाला दिले होते; पण कॉंग्रेसने शेवटपर्यंत प्रस्तावाबाबत मौन धारण करून या गटाची कोंडीच करून टाकली आहे. केंद्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींची मध्यस्थीही कॉंग्रेसने धुडकावल्याची खबर आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे गोव्यातच होते व त्यांनी या गटाच्या प्रस्तावाबाबत श्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील, असे सांगून आपले अंग काढून घेतले आहे.
दरम्यान, या गटाकडून सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भीती यापूर्वी दाखवण्यात येत होती पण सध्याच्या परिस्थितीत विरोधी भाजपकडूनही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने हा गट पूर्णपणे एकाकी पडला आहे. आता उद्या प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतो, हे पाहावे लागेल. उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर या गटात फूट पडणे शक्य आहे व त्यामुळे या गटातील नेते एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहत असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

No comments: