Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 April, 2010

दामबाब पावला!

'मलेरिया कामगारांना दहा दिवसांत रुजू करू'
मुख्यमंत्र्यांकडून आरोग्यमंत्र्यांना फटकार
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गेल्या दोन आठवड्यांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या आरोग्य खात्यातील मलेरिया सर्वेक्षक कामगारांना उशिरा का होईना पण अखेर न्याय मिळाला. या कामगारांकडे सपशेल दुर्लक्ष करणारे आरोग्यमंत्री विश्वजित राणे नवी दिल्लीत असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या कामगारांना येत्या दहा दिवसांत कामावर रुजू करून घेण्याचे आश्वासन दिले. आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. राजनंदा देसाई यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाला मान देऊन आंदोलनकर्त्यांना उपोषणाची सांगता केली. या घटनेमुळे सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या जी - ७ गटातील सदस्य तथा आरोग्यमंत्री राणे यांना जोरदार चपराक बसली आहे.
आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक बोलावली. येत्या दहा दिवसांत या सर्व ७४ कामगारांना सेवेत रुजू करून घेऊ, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले व या कामगारांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा मान राखत कामगारांनी उपोषण मागे घेतले. आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांनी आंदोलनकर्त्यांना लिंबू सरबत दिले व या यशस्वी उपोषणाची अखेर सांगता झाली.
आरोग्य खात्यात गेल्या पंधरा वर्षांपासून मलेरिया सर्वेक्षकपदी सेवेत असलेल्या या कामगारांना अचानकपणे कामावरून काढून नव्या लोकांची भरती सुरू करण्यात आल्याने या कामगारांनी गेल्या दोन आठवड्यांपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. खासगी बस मालक संघटनेचे नेते सुदेश चोडणकर व ऍड. सुभाष सावंत यांच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी हे आंदोलन सुरू केले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेतली असता त्यांनी आपण ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवतो, असे आश्वासन दिले होते, पण पुढे काहीच झाले नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणासाठी बसलेल्या या कामगारांना समाजातील सर्व थरांतून पाठिंबा मिळत राहिल्याने सरकारसमोरही पेचप्रसंग निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार श्रीपाद नाईक, माजीमंत्री माथानी साल्ढाणा यांच्यासहित अनेकांनी या कामगारांना पाठिंबा दर्शवला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी या कामगारांनी मठग्रामचे आराध्य दैवत श्री दामबाब व केरी सत्तरीचा राखणदार श्री देव आजोबा यांचा धावा करून मुख्यमंत्री दिगंबर कामत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना हा अन्याय दूर करण्याची सुबुद्धी देण्याचे साकडेच घातले होते. आरोग्यमंत्री सध्या राजकीय डावपेचांत व्यस्त असले तरी मुख्यमंत्री कामत यांना मात्र सुबुद्धी सुचली. त्यांनी दुपारी आपल्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी यासंबंधी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, संयुक्त आरोग्य सचिव दत्ताराम सरदेसाई, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई व अन्यायग्रस्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्री कामत यांनी या कामगारांना दहा दिवसांच्या आत पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचे आश्वासन दिले. सेवेत नियमित करण्याचे ठोस आश्वासन देणे शक्य नसले तरी त्याबाबत एक विशेष समिती स्थापन करून कालांतराने निर्णय घेण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून या कामगारांनी आपले उपोषण अखेर मागे घेण्याचे जाहीर केले. याप्रसंगी आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांनी स्वतः उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत दिले व उपोषणाची सांगता केली. यावेळी तारा केरकर, ऍड. सुभाष सावंत, सुदेश चोडणकर आदी हजर होते. याप्रसंगी आनंद व्यक्त करताना कामगारांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. या आंदोलनात पाठिंबा दिलेल्या सर्वांप्रती या कामगारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. गोवा लोकसेवा आयोगाने निवडलेल्या शिक्षकांनी पुकारलेल्या यशस्वी उपोषण आंदोलनानंतर बंदर कप्तान कार्यालयासमोरील या जागेवर यशस्वी ठरलेले हे दुसरे उपोषण आंदोलन ठरले आहे.

No comments: