Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 7 April, 2010

खनिज वाहतुकीचा पेडण्यातही बळी

पेडणे, दि. ६ (प्रतिनिधी): मालपे पेडणे येथे खनिजवाहू ट्रक व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन गोसावीवाडा कोरगाव येथील दुचाकीचालक शांताराम सीताराम गोसावी (५४) यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी थोडक्यात बचावली. राज्यात बेदरकारपणे सुरू असलेल्या खनिज वाहतुकीचे गडद सावट आता पेडणे तालुक्यावरही दाटू लागले आहे.
याविषयी सविस्तर माहितीनुसार सत्यवान अर्जुन मांद्रेकर हा गोराउळवाडी रेडी येथील ट्रकचालक एमएच ०७ सी ५२०५ क्रमांकाच्या ट्रकमधून रेडी येथील खनिज माल घेऊन गोव्यात आला होता. शिरसई थिवी येथे सदर खनिज खाली करून मालपे मार्गे पेडण्याला जात असता त्याची धडक पेडणे कोलवाळ येथून मये येथील रेड्यांच्या जत्रेसाठी निघालेल्या शांताराम यांच्या स्प्लेंडर दुचाकीला (जीए ०३ बी ४८३८) बसली. मालपे पेडणे पेट्रोलपंपासमोर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की शांताराम यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या तर पत्नी रस्त्यावर उसळून पडली. शांताराम यांना तातडीने १०८ वाहनाद्वारे तुये शासकीय इस्पितळात नेतेवेळी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी यासंदर्भात ट्रकचालक सत्यवान मांद्रेकर याला अटक केली असून ट्रक ताब्यात घेतला आहे.
मयत शांताराम गोसावी हे शिक्षक रामचंद्र गोसावी (मुष्टिफंड हायस्कूल पणजी) शिक्षक नागेश गोसावी (विकास हायस्कूल वळपेचे मुख्याध्यापक) यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. सुतारकाम करणारे शांताराम गोसावी यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. गेल्या महिन्यात त्यांनी राजीव आवास योजनेखाली घर दुरुस्तीसाठी अर्ज केला होता, त्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी उद्या ७ रोजी पेडणे येथे येणार होते.
मयत शांताराम यांच्या पार्थिवावर उद्या ७ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात २० वर्षीय मुलगी सरिता, १८ वर्षीय मुलगा सचिन व सीताराम हा लहान मुलगा आहे.
पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताराम राऊत पुढील तपास करत आहेत.

No comments: