Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 4 April, 2010

चाकूचा धाक दाखवून विदेशी पर्यटकास गंडा

- करासवाडा येथील थरार
- नऊ लाखांचा माल लंपास
- दोघा भामट्यांवर संशय

म्हापसा, दि. ३ (प्रतिनिधी): करासवाडा म्हापसा महामार्गावर विदेशी पर्यटकाला दोघा दुचाकीचालकांनी ठोकर देऊन व चाकूचा धाक दाखवून त्याच्या बॅगेतील सुमारे ९ लाख रुपयांचा माल लांबवल्याची तक्रार म्हापसा पोलिस स्थानकात नोेंद झाली आहे. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना काल रात्री ९.१५ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मिलिंद भुईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्कुस मेंडोक हा ऑस्ट्रेलियाचा पर्यटक काल रात्री हणजूण येथून जी. ए. ०३ के. २६८७ यामाहा ही भाड्याची दुचाकी घेऊन थिवी येथे आपल्या मित्राकडे जात होता. करासवाडा येथे पुरुषोत्तम हॉटेल ते वृंदावन हॉस्पिटलदरम्यान त्याला दोघा दुचाकीस्वारांनी गाठले. मेंडोक वाहन हाकत असताना त्याच्याबरोबर राहून या भामट्यांनी मेंडोकच्या दुचाकीवर लाथ मारून त्याला खाली पाडले. मेंडोकने स्वतःला सावरेेपर्यंत सदर भामट्यांनी मेंडोकच्या तांबड्या बॅगेतील लॅपटॉप, कॅमेरा, आयपॅड, प्रोजेक्टर, आयकोड, हॅंडफोन, ५० ऑस्ट्रेलियन डॉलर, पासपोर्ट, डायमंड रिंग आणि भाड्याची दुचाकी मिळून ८ लाख ८७ हजारांचे साहित्य लंपास केले. ही घटना रात्री ९.१५ ते ९.३० च्या सुमारास करासवाडा रस्त्यावर वीजेची प्रकाश नाही त्याठिकाणी घडली. मेंडोकने आरडाओरडा केला असता त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलेआहे. उपनिरीक्षक भुईकर पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आज सकाळी पोलिस अधीक्षक अरविंद गावस, निरीक्षक मंजुनाथ देसाई घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

No comments: