Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 5 April, 2010

मुलाला दोन नावांनी खेळवले!

दयानंद नार्वेकरांविरुद्ध आरोप
डॉ. शेखर साळकर न्यायालयात जाणार


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनी आपला मुलगा गणेशराज याला दोन वेगवेगळ्या नावाने खेळविल्यामुळे त्यांना "बीसीसीआय'ने ५ हजार रूपये दंड ठोठावला होता,असा आरोप आज गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्यकारी सदस्य डॉ.शेखर साळकर यांनी केला. यासंदर्भात राज्य सरकार अथवा "बीसीसीआय'ने कारवाई न केल्यास आपण पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचेही डॉ. शेखर साळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे प्रकरण दयानंद नार्वेकर वित्तमंत्री असताना घडल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी डॉ.साळकर यांनी केली आहे. याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऍड. नार्वेकर यांचा पुत्र गणेशराज हा २००५- ६ तसेच २००७-८ अशी दोन वर्षे १५ वर्षाखालील गटात क्रिकेट सामना खेळला होता. "बीसीसीआय'च्या नियमानुसार कोणालाही सलग दोन वर्षे खेळता येत नाही. त्यामुळे आपल्याच मुलाला खेळण्याची पुन्हा संधी मिळावी यासाठी २००७-८ या वर्षासाठी आशिष एन. अशा नावाची कागदपत्रे सादर करून त्याला खेळवण्यात आले होते, असा दावा डॉ. साळकर यांनी केला. याची माहिती "बीसीसीआय'ला मिळताच ऍड. नार्वेकर यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असे सांगून गेल्या दोन वर्षापासून आपण या प्रकरणाची कागदपत्रे मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. नुकतीच ही कागदपत्रे आपल्या हाती लागली असल्याने त्यांनी सांगितले.
"ऍड. नार्वेकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून सलग दुसऱ्या वर्षा खेळण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून आपल्याच मुलाची वर्णी लावून दुसऱ्या एका होतकरू खेळाडूवर अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. ते राजीनामा देणार नाहीत, हे आपणास ठाऊक असल्याने गोवा सरकारने त्यांची हकालपट्टी करून असोसिएशनवर प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी डॉ.साळकर यांनी केली.
बनावट कागदपत्रे सादर करून खेळणे हा गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा आहे. तसेच, गणेशराज हा अल्पवयीन असल्याने ही तक्रार त्यांच्या वडिलांच्या नावाने केली जाणार असल्याचेही डॉ. साळकर यांनी सांगितले.

No comments: