Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 April, 2010

सरकारची कोंडी प्रफुल पटेल यांच्या मध्यस्थीमुळेच फसली!

'जी-७' गटात अस्वस्थता कायम
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखानुदानाला मंजुरी मिळवण्यावरून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना कोंडीत पकडण्याची "जी-७' गटाची व्यूहरचना होती; परंतु राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री प्रफुल पटेल यांनी या व्यूहरचनेपासून या गटाला परावृत्त केले. या गटाच्या सर्व मागण्या आपण धसास लावतो, असे वचन श्री. पटेल यांनी दिले. आता या मागण्यांचा दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींशी पाठपुरावा करण्यावरून ते मागे खेचत असल्याने या गटात काही प्रमाणात नाराजीचा सूर पसरला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी प्रकाश बिनसाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या मागणीबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, असे सांगून हात झटकले. आपण मुंबईत आहे व हा विषय प्रफुलभाई हाताळतात, असे निमित्त पुढे करून त्यांनी संवाद तोडला. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी काही पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस व "जी-७' गटातील मुद्यांवर तोडगा अवश्य निघेल, असा विश्वास व्यक्त केला. या गटाच्या मागण्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत, पण त्या अद्याप सोनिया गांधी यांच्या कानावर घातल्या नाहीत. तो योग कधी येईल तेही निश्चितपणे सांगता येणार नाही, असाही टोला हाणून त्यांनी एका अर्थाने "जी-७' गटाच्या प्रस्तावाचीच फजिती केली.
"जी-७' गटाची नाराजी अद्याप दूर झाली नसली तरी कॉंग्रेस गोटात मात्र कमालीचा उत्साह पसरला आहे. या गटाची झालेली फजिती त्यांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. प्रदेश कॉंग्रेसकडून तयार करण्यात आलेल्या अहवालाची मात्र सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. "जी-७' गटातील एक नेता आपल्या खाणींना परवानगी मिळावी म्हणून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर या गटामार्फत दबाव आणतो, असे बोलले जाते. या नेत्याचे नाव घेण्याचे धारिष्ट कॉंग्रेस नेते दाखवत नसले तरी अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याकडून वाळपईचे अपक्ष आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर असलेला रोख मात्र स्पष्टपणे जाणवतो आहे. सरकारला खऱ्या अर्थाने कोंडीत पकडण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची चांगली संधी होती. ज्याअर्थी ही संधी "जी-७' गटाने गमावली, त्याअर्थी त्यांची फजिती होईल हे देखील जवळजवळ निश्चित झाले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हेच सध्या गोव्यातील या गटाचे नेतृत्व दिल्लीत करतात. प्रफुल पटेल यांचे मुख्यमंत्री कामत यांच्याशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत व त्यामुळे त्यांनीच कामत यांच्या विरोधातील हे बंड निष्काम केले असावे, अशीही शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. प्रफुल पटेल व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे गोव्यात काही व्यावहारिक हित दडले आहे व ते साध्य करण्यासाठीच त्यांच्याकडून "जी-७' गटाच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर सुरू आहे, असेही बोलले जात होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना याबाबत काल काही पत्रकारांनी छेडले असता त्यांनी या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. गोव्यातील या गटाची जबाबदारी खांद्यावर घेतलेले प्रफुल पटेल हे मात्र या गटाच्या मागण्यांबाबत उदासीन दिसत असल्याने या गटात तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
"जी-७' गट तोंडघशी पडल्याने सासष्टीत चर्चिलबंधूंना चांगलाच चेव आला आहे व त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको चांगलेच खवळले आहेत. त्यांनी काल पुन्हा एकदा दिल्लीचा रस्ता धरला आहे. दिल्लीत ते राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात आहे, हे जरी खरे असले तरी निश्चित काय खलबते सुरू आहेत हे मात्र कळू शकले नाही. आज आल्तिनो येथे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सरकारी निवासस्थानी या गटाची पुन्हा एकदा बैठक झाली. सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता या गटाच्या मागण्यांबाबत दिल्लीतील श्रेष्ठी निश्चित निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करून हा गट पूर्णपणे एकसंघ आहे, असा निर्वाळा त्यांनी दिला.

No comments: