Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 November, 2009

गोमतंकीय कलाकारांची बोळवण!

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): 'इफ्फी'अंतर्गत साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा रद्द केल्यामुळे नाराज झालेल्या स्थानिक गोमंतकीय कलाकारांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी या कलाकारांना इफ्फीनंतर फेब्रुवारी किंवा मार्च दरम्यान खास संगीत महोत्सव आयोजित करण्याचे आश्वासन देऊन त्यांची बोळवणच केली .
गोव्यात २००४ सालापासून इफ्फी रंग भरत आला आहे. इफ्फीच्या या रंगात कॉर्निश वा इतर तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आपले रंग भरताना इफ्फीची रंगत अधिकच खुलवली होती. मात्र यंदा इफ्फीच्या आवाराबाहेरील हे कार्यक्रम रद्द केल्याने हे कलाकार नाराज झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कामत यांना भेटून हे कार्यक्रम दरवर्षी प्रमाणेच यंदाही कायम ठेवण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
तथापि मुख्यमंत्री कामत यांनी निवेदन घेऊन गेलेल्या कलाकारांच्या या शिष्टमंडळाला इफ्फीनंतर त्यांचे खास कार्यक्रम आयोजित करू असे आश्वासन दिले आहे. हे कार्यक्रम इफ्फी होऊन गेल्यावर दोन तीन महिन्यांनी आयोजित केले जाणार असल्याने गोव्याची कला साता समुद्रापारच्या प्रसिध्दीला मुकणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असल्याने या महोत्सवात सहभागी होणाऱ्या देशी तसेच विदेशी प्रतिनिधींनाही त्यांची कला न्याहाळण्याची संधी मिळत होती. मात्र यावेळी त्यांचे कार्यक्रमच नसल्याने विदेशी प्रतिनिधींना ती संधी यावर्षी मिळणार नाही हे मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने स्पष्ट झाले आहे.
गोव्यात संगीत महोत्सवाचे खास कार्यक्रम सरकार कधीही आयोजीत करू शकते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवादरम्यान येथील कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली असती तर गोमंतकीय कलेला एक वेगळी उंची मिळाली असती. परंतु नेमकी हीच संधी राज्य सरकारने गमावली असून त्यामुळे नाखूष झालेल्या या कलाकारांनी इफ्फी काळात पदपथांवर गोवा मनोरंजन संस्थेने कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी मागणी केली आहे.
संस्थेने यावेळी पदपथांवर पाश्चात्त्य संगीत वाद्यवृंद समूहाचे कार्यक्रम ठेवण्याची तयारी केली असून संस्थेच्या कार्यकारिणीवरील एका सदस्यालाच त्याचे कंत्राट बहाल करण्यात आले आहे. मनोरंजन संस्थेला वर्षपध्दतीनुसार आमचे कार्यक्रम ठेवायचे नसतील तर त्यांनी अन्य संगीत कार्यक्रमही आयोजित करू नयेत अशी मागणी करणाऱ्या या कलाकारांनी अन्य संगीत कार्यक्रम आयोजित केल्यास तो आमचा अपमान ठरेल,असा गर्भित इशाराही दिला आहे.
अनिलकुमार, सिद्धनाथ बुयांव, डेल्टन कार्दोज, कॉनी एम., पूर्णानंद च्यारी, सी. डी. सिल्वा, राजेंद्र तेलगू, शेरॉन माझारेलो, प्रवीण गावकर, योगराज बोरकर, देवानंद मालवणकर, विष्णू शिरोडकर, अन्नपूर्णा साखरदांडे, विल्सन माझारेलो, सत्यवान नाईक व इतर मिळून एकूण तेहत्तीस कलाकारांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आज सकाळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मडगाव येथील निवासस्थानी देण्यात आले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात अनील कुमार, सिध्दनाथ बुयांव, डेल्टन कार्दोज, कॉनी एम., पूर्णानंद च्यारी, सी. डी. सिल्वा, राजेंद्र तेलगू, शेरॉन माझारेलो व इतरांचा समावेश होता.

No comments: