Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 18 November, 2008

पाळीत भाजपला जबर पाठिंबा

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): गोव्याचे वाटोळे करण्यास पुढे सरसावलेल्या कॉंग्रेस सरकारच्या नेत्यांनी पाळी मतदारसंघातील लोकांवर कितीही आश्वासनांची खैरात केली किंवा विकासाचे खोटे गाजर पुढे केले तरी तेथील मतदार त्यांना अजिबात थारा देणार नाहीत,असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे उतरवण्यात आलेले युवा नेते डॉ.प्रमोद सावंत यांना या मतदारसंघात भरघोस प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करून पाळीवासीय विद्यमान सरकाराविरोधातील आपला रोष जाहीररीत्या प्रकट करतील, असा ठाम विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. आज येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपने शिस्तीत व नियोजनबद्ध प्रचार सुरू केला आहे. ठिकठिकाणी डॉ.प्रमोद सावंत यांना लोकांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. भाजपच्या पूर्वीच्या आमदारांबाबत या मतदारसंघात जो कार्यकर्त्यांत असंतोष पसरला होता त्यामुळे अनेकांनी पक्षापासून फारकत घेतली होती. डॉ.प्रमोद सावंत यांच्या रूपाने युवा व तडफदार उमेदवार यावेळी पक्षातर्फे रिंगणात उतरवण्यात आल्याने कार्यकर्त्यांत नवा उत्साह व जोष पसरला असून सगळेजण मोठ्या निर्धाराने कामाला लागले आहेत,असे पर्रीकर म्हणाले.
विद्यमान सरकारचे सर्व पातळीवर अपयश व प्रशासकीय गलथानपणामुळे सामान्य लोकांची होणारी फरफट यामुळे लोक कॉंग्रेस राजवटीला विटले असून या लोकांचे मोठे पाठबळ यावेळी भाजपला मिळत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री विविध ठिकाणी भाषणांतून पाळी मतदारसंघासाठी करीत असलेल्या घोषणा आणि आश्वासने ही पोकळ भाषणबाजी असल्याचा ठाम विश्वास लोकांना असल्याने कुणीही याकडे गांभीर्याने पाहत नाही,अशी खिल्लीही पर्रीकर यांनी उडवली.
अनुसूचित जमातींवर
कॉंग्रेसचा नेहमीच अन्याय

राज्यात बहुसंख्य असलेल्या अनुसूचित जमातीला आरक्षणाचा अधिकारच मुळी भाजप सरकारने दिला,असे पर्रीकर म्हणाले. केवळ अंतर्गत तडजोडीसाठी मडकईकर यांचे मंत्रिपद काढून आता त्यांना आश्वासनांवर झुलवत ठेवून कॉंग्रेसकडून या घटकाची चेष्टा सुरू असल्याचे पर्रीकर म्हणाले. आता पाळी पोटनिवडणुकीनंतर मडकईकर यांना मंत्रिपद देणार अशी आवई उठवली जात असली तरी त्यासाठी मंत्रिमंडळातून कोणाला काढणार,याचा खुलासा कॉंग्रेस नेत्यांनी पाळीतील जनतेसमोर करावा,असे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकारने या घटकासाठी आरक्षित असलेल्या सुमारे १७०० सरकारी जागा भरण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. काही जागा सर्वसामान्य विभागात घुसडवून या लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मडकईकरांनी कॉंग्रेस सरकारात क्रीडामंत्री असताना गोवा क्रीडा प्राधिकरणात पदांची भरती करताना अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा का नाही भरल्या याचे उत्तर त्यांनी आपल्या समाज बांधवांना द्यावे,असे आवाहनही पर्रीकरांनी केले. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास ही सर्व पदे खास मोहीम राबवून या समाजातील लोकांतून भरली जातील,असे आश्वासनही त्यांनी दिले.

No comments: