Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 22 November, 2008

सोमालियात अपहृत जहाजावर आगोंदमधील युवक सुरक्षित

आगोंद, दि. २१ (वार्ताहर) - सोमालियातील चाच्यांनी मंगळवारी अपहरण केलेल्या "एम. टी. डिल्याट' या विदेशी जहाजावरील सहा भारतीय कर्मचाऱ्यांत काणकोण तालुक्यातील आगोंदचा क्लाईव्ह फर्नांडिस याचा समावेश असून आपण सुरक्षित असल्याचे त्याने कुटुंबीयांना कळवले आहे.
परदेशातील एका जहाज कंपनीत काम करणारे त्याचे वडील गेले महिनाभर घरी आहेत. अपहृत सहा भारतीय खलाशांपैकी क्लाईव्ह फर्नांडिस (२३) हा येत्या काही दिवसांत आपल्या आगोंद येथील घरी परतणार होता. तथापि, एडनच्या खाडीत त्याचे अन्य खलाशांसोबत अपहरण करण्यात आले आहे. काल तो आपल्या इराण येथील मुख्यालयात कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून घरी परतणार होता. तथापि, त्याच्या जहाजाच्या अपहरणाची बातमी वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध होऊन ती ताबडतोब आगोंद परिसरात पसरली व तो चर्चेचा विषय बनला. क्लाईव्ह काम करीत असलेले जहाज एम.व्ही. डिल्याटच्या अपहरणानंतर संबंधित कंपनीचे अधिकारी सोमालियातील चाच्यांशी संपर्क ठेवून आहेत. काल गुरुवारी रात्री क्लाईव्हने आपल्या घरी फोन करून आपण व अन्य भारतीय साथीदार सुखरूप असल्याचे कळवले आहे. फोनवर इंग्रजीतच बोलण्याचा हट्ट अपहरणकर्ते धरत आहेत. अपहरणकर्त्या चाच्यांशी कंपनीचे अधिकारी वाटाघाटी करत असून यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा क्लाईव्हने त्याचे वडील व्हिन्सेंट यांच्याशी बोलताना व्यक्त केली. खुद्द व्हिन्सेंट यांनीच प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली.
एडनच्या आखातात वारंवार व्यापारी जहाजे सोमालियन अपहरणकर्ते पळवून मोठ्या खंडणीच्या आपल्या मागण्या मान्य करून घेत आहेत. पूर्वी ते भुरट्या चोऱ्या करत होते. तथापि, आता त्यांची भूक वाढत चालल्याने जास्त धनाच्या लोभापायी जहाजेच पळवण्याचा सपाटा त्यांनी लावल्याची माहिती एका निवृत्त खलाशाने दिली. याच गावातील दोन घटनांत ग्रामस्थांना वाईट अनुभव आल्यामुळे क्लाईव्ह सुखरूप परतावा अशी प्रार्थना आता आगोंदवासीय करीत आहेत.

No comments: