Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 20 November, 2008

कचऱ्याचा विळखा


पालक खवळले
महापालिका ढिम्मच


पणजीत सर्वत्र असह्य दुर्गंधी, शिक्षक व विद्यार्थ्यांना उलट्या
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - पाटो येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद झाल्याने येथील ओल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मळा येथील विविध विद्यालयांतील त्रस्त विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी महापौरांच्या दालनात कचरा टाकण्याची टोकाची भूमिका का घेतली याचे नेमके कारण अखेर आज उघड झाले. आज सकाळी मळा येथील पीपल्स हायस्कूलची एक शिक्षिका व अकरा विद्यार्थी मिळून एकूण बारा जणांना या असह्य दुर्गंधीमुळे अचानक उलट्या सुरू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, भारतीय वैद्यक संघटनेच्या पथकाने संध्याकाळी पाटो कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली असता आरोग्याच्या दृष्टीने तेथे भयावह परिस्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पणजी व आसपासच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाटो येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पामुळे मळा व आजूबाजूच्या परिसरातील लोक भयंकर दुर्गंधीने हैराण झाले आहेत. एका मळा भागातच एकूण पाच विद्यालये आहेत. त्यात मेरी इम्यॅक्युलेट, पीपल्स, मुष्टीफंड, हेडगेवार,सेवंथ डे ऍडव्हांटीस आदींबरोबर जयराम कॉम्प्लेक्स ही निवासी वसाहत आहे. या दुर्गंधीमुळे तेथील रहिवासी, विद्यार्थी व शिक्षकांचे जीणे कठीण बनले आहे. गेली दिड वर्षे या समस्येला तोंड देत असलेल्या या लोकांना महापालिकेकडून अजूनही न्याय मिळत नसल्याने या लोकांचा पारा सध्या बराच चढलेला आहे. कचरा समस्येबाबत तोडगा काढण्यात महापालिका अपयशी ठरल्याने विद्यार्थ्यांनी पणजीत मोर्चा काढून महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्या दालनात कचरा टाकून अभिनव निषेध नोंदविला होता. या प्रकारामुळे शिक्षण खात्याकडून संबंधित विद्यालयांना कारवाईच्या नोटीसा पाठवण्यात आल्यानेही हे प्रकरण सध्या गाजत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या निषेधामागचे कारण खरोखरच प्रामाणिक होते हे आज घडलेल्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे.
विद्यार्थ्यांना उलट्या
पीपल्स हायस्कूल परिसरात पसरलेल्या असह्य दुर्गंधीमुळे पीपल्स हायस्कूलमधील दलिला डिकॉस्ता या शिक्षिकेलाच उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर हळूहळू एकेक विद्यार्थी करता करता अचानक अकरा विद्यार्थ्यांनाही उलट्या होऊलागल्याने विद्यालयात एकच खळबळ उडाली. व्यवस्थापनाने तात्काळ या विद्यार्थ्यांना वाचनालयात बसवून घेतले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. या दरम्यान, "१०८' तात्काळ रूग्णसेवेशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना आरोग्य चाचणीसाठी पाठवण्यात आले. सदर मुलांच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आल्याने हे वृत्त पणजी परिसरात पसरले. या घटनेमुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरल्याने आज पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.विनय सुर्लकर यांनी दिली. या विद्यार्थ्यांना पणजी येथील आरोग्य केंद्रात तपासणी करून घरी पाठवण्यात आले. उलट्या केलेल्या विद्यार्थ्यांत कु.सोहेल खान,कु.हरीश गावस, कु.प्रणव मडकईकर,कु.वामन सरदेसाई,कु.पुजा नाईक,कु.जॉएल नुनिस, कु.रोहीत नाईक आदींचा समावेश होता.
दरम्यान, महापालिकेचे नगरसेवक असलेले ऍड. अविनाश भोसले या विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष असून विद्यार्थ्यांना उलट्या होत असल्याचे वृत्त कळताच विद्यालयातून आपल्या पाल्याला घेऊन निमूटपणे घरी जाण्याच्या त्यांच्या कृतीवर तेथे उपस्थित काही पालकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या या बेजबाबदार कारभारविरूद्ध त्यांनी आवाज उठविण्याचे सोडून मूग गिळून गप्प बसण्याच्या त्यांच्या कृतीबद्दल या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पर्रीकरांची तात्काळ धाव
पीपल्स हायस्कूलमधील या घटनेचे वृत्त कळताच पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांनीही विद्यालयात भेट दिली. पर्रीकर यांनी कचऱ्याच्या समस्येबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका करून महापालिकेकडूनही ही समस्या सोडवण्यात विशेष रस घेतला जात नसल्याचे सांगितले. आमदार या नात्याने हा प्रश्न सोडवण्यास संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देऊनही महापालिकेच्या सत्ताधारी गटाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाटो परिसरात महापालिकेकडून कचरा टाकला जात नाही,अशी माहिती महापौर देतात. तथापि, मुळातच महापालिकेचे नाव नसलेले व त्यांच्याच मालकिचे वाहन रात्री उशीरा येथे कचरा टाकत असल्याचा गौप्यस्फोटही पर्रीकर यांनी केला. दरम्यान,पर्रीकर यांनी यावेळी पोलिसांशी संपर्क साधून तेथे रात्री बेकायदा कचरा टाकणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी,अशी मागणीही केली. स्वप्नील नाईक यांनी यासंबंधी पोलिसांना पत्र पाठवण्यात आल्याचे सांगून मुळात या प्रकल्पाकडे जाणारा मार्गच बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शिक्षण संचालकांनी अनुभव घ्यावा
कचऱ्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीवर तोडगा काढण्यात महापालिकेला आलेल्या अपयशाविरोधात मोर्चा काढून महापौरांच्या दालनात कचरा टाकलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारून नोटीसा पाठवलेल्या शिक्षण संचालकांनी एकदा प्रत्यक्ष येथे येऊन परिस्थितीचा अनुभव घ्यावा,असा सल्ला उपस्थित पालकांनी दिला. विद्यालयांतील वातावरण शिक्षणासाठी व आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याची जबाबदारी शिक्षण संचालकांनी घेण्याची गरज आहे.
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पथकाची भेट
पीपल्स हायस्कूलमध्ये घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल भारतीय वैद्यकीय संघटनेने घेतली आहे. संघटनेच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्यावतीने आज डॉक्टरांच्या खास पथकाने पीपल्स हायस्कूल व पाटो येथील वादग्रस्त कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार या परिस्थीतीवर तात्काळ तोडगा काढला गेला नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक अवस्था निर्माण होण्याची शक्यता समितीचे पदाधिकारी डॉ.शेखर साळकर यांनी व्यक्त केली. मुळातच कचऱ्याचा विषय हा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याने त्याबाबत व्यापक चर्चा व योग्य उपाययोजनांची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
यासंदर्भात मुख्य सचिव जे. पी. सिंग,आरोग्य सचिव व आरोग्य संचालकांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगून जर सरकार हा विषय सोडवण्यास अपयशी ठरले तर नागरीकांना रस्त्यावर येणे भागच पडेल,असेही डॉ.साळकर म्हणाले. नागरीकांच्या या लढ्याला संघटनेचा पूर्ण पाठींबा राहील,असे वचनही त्यांनी दिले. संघटनेच्या या पथकात गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ.जयंत भांडारे,सचिव डॉ.सुशीला फोन्सेका,डॉ.रूफिन मोंतेरो,डॉ.अमोल, डॉ.गोविंद कामत आदींचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी "गोवा पीपल्स फोरम'चे निमंत्रक ऍड.सतीश सोनक, "ऊठ गोंयकारा'चे निमंत्रक अमोल नावेलकर, अखिल गोवा नगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू, नगरसेवक ऍड. अविनाश भोसले,पर्यावरणप्रेमी सुदीप डोंगरे, बाल आयोगाच्या सदस्य एजिल्डा सापेको, रोटरी क्बलचे श्री. सिरसाट, हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर, "मदरअर्थ'संस्थेचे अनिल केरकर हजर होते.

No comments: