Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 21 November, 2008

जर्मन मुलीवरील अत्याचार प्रकरणाची आज सुनावणी

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - संपूर्ण गोव्याचे आणि जर्मन दुतावासाचे लक्ष लागून राहिलेला अल्पवयीन जर्मन मुलीवरील बलात्कार प्रकरणाची सुनावणी उद्या (शुक्रवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुरू होणार आहे. या खटल्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार आज (गुरुवारी) गोव्यात दाखल झाले. या प्रकरणात राजकीय नेत्यांचे पुत्र तसेच नातेवाइक गुंतल्याचे आरोप झाल्याने २४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी यासंदर्भात "सुमोटो' याचिका दाखल करून घेतली होती.
शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणातून आपल्या मुलाला सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले असून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची या खटल्यासाठी मदत घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांची बाजू भक्कम करण्यासाठी संशयित आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारनेही या प्रकरणात ऍड. जेठमलानी यांची मदत घेतल्याची वदंता आहे. दरम्यान, या अत्याचार प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी आज खंडपीठात सादर केला.

घटनाक्रम
०२ ऑक्टोः अश्लील एसएमएस पाठवल्याप्रकरणी
रोहित मोन्सेरातविरोधात कळंगुट पोलिसांत जर्मन महिलेची तक्रार.
१२ ऑक्टोः रोहितचे वडील शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गुन्ह्याचे खंडण केले.
१३ ऑक्टोः रात्री १०.३० वा. जर्मन महिलेच्यो वकिलांवर प्राणघातक हल्ला.
१४ ऑक्टोः कंपाल क्लिनिकमधे पोलिस अधीक्षकांकडे रोहितविरोधात बलात्काराची तक्रार नोंद.
१५ ऑक्टोः पोलिसांच्या तपासाला विरोध करीत वैद्यकीय चाचणीसाठी मुलीचा नकार.
१६ ऑक्टो ः रोहित विरोधात "लूक आऊट' नोटीस जाहीर.
२२ ऑक्टोः वैद्यकीय चाचणीसाठी पीडित मुलीच्या आईची अनुमती.
२३ ऑक्टोः मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या वॉरन आलेमाव याच्यावरही बलात्काराचा आरोप.
२४ ऑक्टोः जर्मन महिलेची वॉरन विरोधात तक्रार दाखल. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडून "सुमोटो' जनहित याचिका दाखल.
२८ ऑक्टोः वॉरन आलेमावची कळंगुट पोलिस स्थानकात जबानी नोंद.
०१ नोव्हें ः कॅमेऱ्यासमोर पीडित जर्मन मुलीची न्यायालयात जबानी नोंद.
०२ नोव्हें ः जर्मन मुलीची "गोमेकॉ'त वैद्यकीय चाचणी.
०३ नोव्हें ः रोहितविरोधात नव्याने समन्स.
०४ नोव्हें ः दु. १२.३० वा. रोहित कळंगुट पोलिसांना शरण व त्यानंतर अटक
०५ नोव्हें ः रोहितला ३ दिवस पोलिस कोठडी.
०९ नोव्हें ः बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी जर्मन महिलेचे कळंगुट पोलिसांना पत्र.
१० नोव्हें ः रोहितला बाल न्यायालयात सशर्त जामीन मंजूर.
----------------------------------------------

No comments: