Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 21 November, 2008

उत्तेजक विक्री प्रकरणी हणजुणेत दोघांना अटक

१.७२ लाखांचे अमली पदार्थ छाप्यात जप्त
पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत गोव्यात मादक पदार्थांच्या तस्करीत आणि विक्रीत स्थानिक लोक गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. आज टाकलेल्या छाप्यात हणजूण येथील गणेश नारायण नाईक (३३) व प्रसाद रामू हरमलकर(३९) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून १ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक केलेल्यांपैकी प्रसाद हा सरकारी कर्मचारी असून विद्यमान कॉंग्रेस सरकारमधील एका मंत्र्याच्या विशेष कार्याधिकाऱ्याच्या (ओएसडी) वाहनाचा चालक म्हणून नोकरी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन मारुती व्हॅन जप्त केल्या आहेत.
दोघे संशयित हणजूण येथील पाराडिसो क्लबच्या शेजारी एका वाहनात बसून अमली पदार्थांची विक्री करताना पोलिसांनी छापा टाकला. यात ५३ ग्रॅम चरस(५ हजार ३००रु.), १५ ग्रॅम कोकेन (७५ हजार रुपये), १० ग्रॅम एमडीएमए (३० हजार रुपये), २० ग्रॅम चरस (२ हजार रु), २ ग्रॅम कोकेन (१० हजार रु.), ११ ग्रॅम एमडीएमए (३३ हजार रुपये) व ४ ग्रॅमच्या १८ एक्सटसी टॅबलेट पोलिसांनी जप्त केल्यात. काल रात्री ११.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान हा छापा टाकण्यात आला. अटक झालेले संशयित मादक पदार्थाचे घाऊक विक्रेते असून त्यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिस तपास करीत आहेत.
जेथे "खास' पार्टीचे आयोजन केले तेथे ही जोडगोळी पर्यटक परवाना असलेली टॅक्सी घेऊन जायची. त्यानंतर टॅक्सी पाकिर्ंगच्या ठिकाणी उभी करून ग्राहकांना अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी प्रथम गणेश नारायण नाईक याच्यावर छापा टाकला. नंतर प्रसादला अटक करण्यात आली. प्रसाद हा हस्तकला खात्यात चालक म्हणून नोकरीला असून सध्या एका मंत्र्याच्या विशेष कार्याधिकाऱ्याचे वाहन चालवतो.
अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी. एन. पाटील, पोलिस शिपाई दिना मांद्रेकर, हरी नाईक व साईश पोकळे यांनी या कारवाईत भाग घेतला.

No comments: