Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 16 November, 2008

पणजीतील पाणीपुरवठा काही प्रमाणात सुरळीत

आज आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा
पणजी, दि.१५ (प्रतिनिधी) - पणजी व परिसरातील पाणी टंचाईमुळे येथील लोकांचा चढलेला पारा व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रश्न युद्धपातळीवर सोडवण्याचे आदेश दिल्यानंतर उतरला. परिणामी आज बहुतेक भागांत काही अंशी पाणीपुरवठा सुरू झाला,अशी माहिती जनमानसाचा कानोसा घेतला असता मिळाली. जुने गोवे येथील कदंब पठारावर जलवाहिनी बदलण्यात आल्याने सुरुवातीस काही भागात गढूळ पाणीपुरवठा झाला; परंतु नंतर सर्व टाक्या साफ केल्याने संध्याकाळपर्यंत स्वच्छ पाणी पुरवण्यात आल्याची माहिती पणजी विभागाचे कार्यकारी अभियंता के.आर.श्रीकांत यांनी "गोवादूत'कडे बोलताना दिली.
पणजी व परिसरातील काही भागांत गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीटंचाईचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे. मुळात ही टंचाई कशामुळे निर्माण होते याचा खुलासा देण्यातच अधिकारी अपयशी ठरत असल्याने नक्की ही समस्या निर्माण होण्यामागचे खरे कारण अद्याप स्पष्ट होत नाही. जुने गोवे येथील कदंब पठारावर ८५० मीटर लांब ७ एमएमची जलवाहिनी बदलण्याचे काम काही कारणांस्तव लांबल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले. जुने गोवे बगल मार्गाला जोडूनच ओपा खांडेपार येथून पणजीसाठी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकली आहे. या या महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने ही जलवाहिनी बाजूला हटविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
दरम्यान,सांतइनेज चर्चसमोरील भागांत काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या भागातील लोकांना टॅंकरव्दारे पाणी पुरवण्यात येत आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.आल्तिनो,बोक द व्हॉक,मेरशी,ताळगाव,सांताक्रुझ आदी भागात उद्यापर्यंत नियमित पाणीपुरवठा होणार अशी माहितीही त्यांनी दिली.

No comments: