Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 21 November, 2008

सार्वजनिक उद्योगांतील अधिकाऱ्यांना वेतनवाढ

दिल्ली, दि.२० - केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (सीपीएसई) कार्यरत अधिकाऱ्यांच्या वेतनात ५० ते ३०० टक्क्यांपर्यंतच्या भरघोस वाढीला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
ही वेतनवाढ १ जानेवारी २००७ पासून लागू होणार असून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या वेतन दुरुस्ती समितीने वेतन वाढीची शिफारस केली होती. मंत्रिमंडळाने २१६ केंद्रीय पीएसयूमध्ये कार्यरत २,५८,००० मंडळस्तरीय अधिकारी तसेच युनियनमध्ये समावेश नसलेल्या १,२०,००० सुपरवायझर श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठीही वेतनवाढ मंजूर केली. मंत्रिमंडळाने सध्या फायद्यात असलेल्या पीएसयूसाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या ३० टक्के समान वाढीला मंजुरी दिली असून फारशा लाभात नसलेल्या पीएसयूमधील वेतनवाढ त्यांच्या व्यवहारांवर अवलंबून राहील. आणि साधारणत: १० ते २० टक्क्यांदरम्यान येथे वेतनवाढ अपेक्षित राहील असे म्हटले आहे.
प्रस्तावित पॅकेजमध्ये घरभाडे भत्ता, महागाई भत्ता व अन्य भत्त्यांमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीचा समावेश असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिली. याशिवाय काही प्रोत्साहन भत्तेही मिळणार आहेत. नव्या वेतन श्रेणीमुळे जो अतिरिक्त खर्च होणार आहे त्याची जबारदारी सीपीएसईवर राहील. याकरिता अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

No comments: