Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 17 November, 2008

अपहृत जहाजाची सुटका

१८ भारतीय सुखरूप
मुंबई, दि. १६ - सोमालियातील समुद्री चाच्यांनी अदनच्या खाडीत १५ सप्टेंबर रोजी अपहरण केलेले भारतीय मालवाहू जहाज एम.टी.स्टॉल्ट वेलरची रविवारी सकाळी सुटका करण्यात आली असून जहाजावर असलेल्या १८ भारतीयांसह २२ सदस्य सुखरूप असल्याची माहिती राष्ट्रीय समुद्रगमन संघटनेने (एनयूएसआय) दिली.
सुटका झालेले भारतीय नाविक मुंबई येथे परतणार असून त्यांची प्रकृतीही चांगली असल्याचे एनयूएसआयचे अध्यक्ष अब्दुल गनी यांनी सांगितले. त्यांनी सुटकेसंदर्भात विस्तृत माहिती मिळाली नसली तरी भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजता जहाजाची सुटका झाली. सुटकेसाठी खंडणीची रक्कमही दिली असण्याची शक्यता आहे. परंतु नेमकी किती रक्कम दिली याबाबत काहीच माहिती नसल्याचे ते म्हणाले. गनी यांनी भारतीय नौदलाचे आभार मानले. व नौदलाच्या कार्याची स्तुती करतानाच ते जहाजाला धोकादायक क्षेत्रातून सुखरूप परत घेऊन येथील असा विश्वास व्यक्त केला.
अपहरणकर्त्यांनी रविवारी सकाळी जहाजाला मुक्त केल्याची आपल्याला सरकारतर्फे माहिती देण्यात आली असे जहाजाचे कॅप्टन प्रभात गोयल यांच्या पत्नी सीमा गोयल यांनी सांगितले. येत्या चार-पाच दिवसांत १८ भारतीय मायदेशात पोहोचतील. सुटकेसाठी खंडणी देण्यात आली काय असे विचारले असता यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सीमा म्हणाल्या.
जपानी कंपनीच्या मालकीचे आणि मुंबईच्या फ्लीट मेरिन लिमिटेडच्या व्यवस्थापनात मालवाहू जहाज स्टॉल्ट वेलरचे संचालन केले जातेे. गेल्या १५ सप्टेंबर रोजी सोमालियातील सशस्त्र समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण केले होते. त्याचप्रमाणे चालक दलातील सदस्यांच्या सुटकेसाठी ६० लाख अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली होती. नंतर खंडणीत घट करून ती २५ लाख डॉलर्स करण्यात आली होती.

No comments: