Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 16 November, 2008

विहिंपचे देशव्यापी आंदोलन सुरू

हिंदूंना द्वेषपूर्ण वर्तणुकीचा केंद्रावर आरोप
मुंबई, दि. १५ ः केंद्र सरकार व काही राज्य सरकारे हिंदूंच्या संदर्भात द्वेषपूर्ण वर्तणूक करीत असल्याचा आरोप करीत विश्व हिंदू परिषदेने याविरुद्ध देशभर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे.
विहिंपचे केंद्रीय सहमंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी आज पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, हे आंदोलन सुमारे महिनाभर चालेल. यात निदर्शने, धरणे, वाहनांची रॅली, ईमेल मोहीम, एसएमएस मोहीम, यज्ञ-याग, महिलांद्वारे हवन आदींचा समावेश आहे.
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला फाशीची शिक्षा ठोठावून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नाही. याउलट, मालेगावच्या प्रकरणात मात्र एका साध्वीला हेतुपूर्वक गुंतविले जात आहे आणि लष्कराच्या अधिका-यांना जेलमध्ये टाकले जात आहे आणि हे सारे हिंदुद्वेषातूनच केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
साध्वी आणि इतर काही आरोपींच्या अटकेच्या संदर्भात कायदे धाब्यावर बसविले गेले, असा आरोप करताना आबदेव म्हणाले की, कुठल्याही आरोपीला चोवीस तासांत न्यायाधीशापुढे उभे करण्याचा नियम डावलून या लोकांना अनेक दिवस बेकायदेशीरपणे पोलिसांनी ताब्यात ठेवले. हा गुन्हा आहे आणि याविरुद्ध आम्ही न्यायालयात, तसेच मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार आहोत.
साध्वी प्रज्ञाशी विहिंपचा संबंध काय, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, तसा प्रत्यक्ष संबंध नाही. परंतु, संबंध असण्यापेक्षा हिंदूंवर अन्याय केला जात आहे, हे महत्त्वाचे. आणि, त्याविरुद्ध विहिंप लढा देणार आहे.
केंद्रातील संपुआ सरकार आता स्वत:च दहशतवादाचे समर्थक बनत चालले आहे, असा आरोप करून आबदेव म्हणाले की, दहशतवादापायी बदनाम झालेल्या मुस्लिमांचे समर्थन, त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करणे यातून सरकार स्वत:च बदनामीच्या घेऱ्यात फसत चालले आहे.

No comments: