Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 22 November, 2008

"इफ्फी'आजपासून

"वॉरलॉर्डस'ने
पडदा उघडणार
राजधानी नटली
प्रतिनिधींची झुंबड
कडेकोट बंदोबस्त

रेखाची प्रमुख उपस्थिती


पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - "३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' "इफ्फी-०८' चे उद्घाटन उद्या २२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पणजी येथील कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात थाटात होणार आहे. या सोहळ्याला सदाबहार अभिनेत्री रेखा प्रमुख पाहुण्या या नात्याने उपस्थित राहणार असून चिनी फिल्म " वॉरलॉर्डस'ने महोत्सवाचा पदडा उघडणार आहे.
या महोत्सवासाठी पणजी शहर नववधूसारखे नटले असून गोव्यातील हा पाचवा महोत्सव होय. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत, राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा, केंद्रीय चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम.खान उपस्थित असतील. मूळ गोमंतकीय तेलगू अभिनेत्री इलियान डिक्रुझ ही या उद्घाटन सोहळ्याला खास आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहे. इफ्फीसाठी कला अकादमी,आयनॉक्स व मॅकनिज पॅलेसचा परिसर झगमगून गेला आहे. विविध प्रादेशिक तथा विदेशी प्रतिनिधींचे आगमन राजधानीत झाल्याने खऱ्या अर्थाने महोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्या शनिवारी दुपारी १२.३० वाजता "फिल्म पोस्टर' प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आनंद प्रकाश यांच्या हस्ते होईल. राष्ट्रीय भारतीय फिल्म पुरातत्त्व विभागातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून तेथे चित्रपट निर्मितीपासून आत्तापर्यंतच्या पोस्टरांचा आनंद चित्रपट जाणकार तथा समीक्षकांना लुटायला मिळेल.
कडेकोट सुरक्षा
महोत्सवानिमित्ताने सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहे. महोत्सव परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यात आले असून केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या खास "इफ्फी' साठी तैनात करण्यात आल्या आहेत. प्रतिनिधींच्या चित्रपट प्रदर्शन ठिकाणी जाण्याच्या सोयीसाठी रिक्षांची सोय करण्यात आली आहे. प्रतिनिधी कार्डांचे वितरण जोरात सुरू असून त्यासाठी बाहेरून आलेल्या प्रतिनिधींची झुंबड उडाली आहे.
दरम्यान, महोत्सवासाठी येणाऱ्या कलाकारांत कबीर बेदी,मनीषा कोईराला,अकबर खान,नासिरूद्दीन शहा व त्यांचा मुलगा,पद्मिनी कोल्हापूरे,सचिन,सुप्रिया,पल्लवी जोशी आदींचा समावेश आहे. याशिवाय अन्य मातब्बर कलाकारांची उपस्थितीही असेल असे सरकारी सूत्रांनी सांगितले. यंदा स्थानिक तथा पर्यटकांसाठी खास खुल्या तिकिटांची सोय करण्यात आली आहे. फक्त भारतीय चित्रपट पाहण्याची सोय या योजनेअंतर्गत राहणार असून दुसऱ्या दिवशीची तिकिटे आदल्या दिवशी निश्चित करून ठेवावी लागणार आहेत. फिचर फिल्म विभागाची सुरुवात "यारविंग'या चित्रपटाने होणार असून नॉन फिचर फिल्मची सुरुवात" मेमरिज,मुव्हमेंट ऍण्ड अ मशीन ' या चित्रपटाने होणार आहे. भारतीय पॅनोरमाची सुरुवात "थॅक्स मॉं' या इरफान कमल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने होणार आहे.

No comments: