Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 21 November, 2008

आली लहर; केला कहर!

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - मोटार चालवता येत नसतानाही रागाच्या भरात ती सुरू करून तीन दुचाकी, एक चार चाकी यांना धक्का देत "सोल ऑफ आशिया' या मोठ्या शोरुममध्ये घुसवल्याने दोघे गंभीर जखमी झाले; तर शोरूमचे सुमारे अडीच लाख रुपये नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी पप्पू कलाड या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.
या विषयीची पोलिस तक्रार शोरूमचे मालक जगूर अहमद वाणी यांनी पणजी पोलिसांत नोंदवली आहे. जखमींमध्ये शोरूमचा सुरक्षा रक्षक प्रेम भंडारी (३५) व कामगार नसीम पंजाबी (२२) यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार "ऍमवे' या कंपनीचे वाहन तेथे उभे करण्यात आले होते. यावेळी या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने वाहन चालकाकडे वाहन शिकवण्याचा हट्ट धरला. चालकाने त्यास नकार दर्शवला. त्यामुळे रागाच्या भरात कार्यालयातून वाहनाची चावी आणून कलाड याने वाहन सुरू केले. ते वाहन गिअरमध्ये असल्याने जोरात पुढे गेले. त्यामुळे बिथरलेल्या पप्पूने मिळेल त्या दिशेने वाहन पुढे नेत समोर असलेल्या "सेल ऑफ आशिया' या शोरुममधे घुसवले. त्यापूर्वी त्याने शोरूमसमोर उभी करून ठेवलेली ऍक्टिवा, बुलेट, टीव्हीएस आणि "व्हॅगनर' या वाहनांना जोरदार धडक दिली. यावेळी या शोरुमच्या बाहेर असलेला सुरक्षा रक्षक प्रेम भंडारी व कामगार नसीम पंजाबी यांनाही जखमी केले. शोरूमच्या बाहेर असलेल्या वाहनांचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचनामा हवालदार श्री. ठाकूर यांनी केला. या विषयीचा तपास पोलिस निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments: