Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 16 November, 2008

राज ठाकरे यांना अटक व सुटका

मुंबई, दि. १५ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात जमशेदपूर न्यायालयानेे अजामीनपात्र वॉरंट काढल्यावर राज यांनी न्यायालयात
शरणागती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याकरता ते माझगावला निघाले असतानाच त्यांना पोलिसांनी तांत्रिक अटक केली. दरम्यान, न्यायालयाने राज यांना ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला.
उत्तर भारतीय नेते छटपूजेचा उपयोग करुन महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. हे प्रकार थांबले पाहिजे, असे राज यांनी विक्रोळीच्या जाहीर सभेत सांगितले होते. त्या वक्तव्याच्या हवाल्याने जमशेदपूरमधील एका वकिलाने भावना दुखावल्याचे सांगत राजविरोधात खटला भरला होता. याबाबत नोटीस पाठवूनही राज सुनावणीसाठी जमशेदपूरच्या न्यायालयात हजर राहिले नाहीत. अखेर न्यायालयाने राजविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले. या वॉरंटवर बरेच दिवस कारवाई झाली नसल्याचे पाहून स्मरणपत्र पाठवण्यात आले. त्यानंतर राज यांना मुंबई पोलिसांनी आज अटक केली.
राज ठाकरे यांच्यावतीने याप्रकरणी माझगाव कोर्टात ट्रांझिट वॉरंटसाठी अर्ज करण्यात आला. मात्र कोर्टाने अर्ज फेटाळला. त्यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यात आला. कोर्टाने जामीन मात्र मंजूर केला. जमशेदपूरमध्ये आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती राज ठाकरेंतर्फे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात व्यक्त केली. त्या आधारेच जामीन मंजूर झाला. त्यामुळे आता राज ठाकरे यांची रवानगी जमशेदपूरच्या न्यायालयाकडे होणार नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान , राज यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच माझगाव न्यायालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. राज यांना जामीन मिळाल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आनंदाने घोषणाबाजी करुन त्यांनी न्यायालयार्चा परिसरही दणाणून सोडला.

No comments: