Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 17 November, 2008

आधी कचरा हटवा; मग नोटिसा पाठवा

शिक्षक, पालकांतून संतप्त प्रतिक्रिया
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - शिक्षण खात्याने विद्यालयाच्या व्यवस्थापनांना नोटिसा पाठवण्याचा पराक्रम न करता, विद्यार्थ्यांना कचऱ्यामुळे वर्गांत सोसाव्या लागणाऱ्या असह्य दुर्गंधीपासून मुक्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी आणि पालकांनी व्यक्त केली आहे.
"विद्यार्थ्यांनी त्या दिवशी माझ्या टेबलवर कचरा ओतल्याबद्दल शिक्षकांनी दिलगीरी व्यक्त केली होती. तथापि, शिक्षण खात्याने त्यांना ज्या नोटिसा बजावल्याप्रकरणी आपणास काहीही म्हणायचे नाही' असे प्रतिक्रिया महापौर टोनी रॉड्रिगीस म्हणाले.
दीड वर्षापासून कचऱ्याची असह्य दुर्गंधी सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही दिवसापूर्वी पणजी महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा ओतून निषेध व संताप व्यक्त केला होता. त्यावेळी महापालिकेने तडकाफडकी दुपारी शिक्षकांची आणि पालिकेची बैठक बोलावून त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा घडवून आणली होती. त्याप्रमाणे महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा ओतल्यानंतर शिक्षकांनी खेद व्यक्त केल्याने महापालिकेने व शिक्षकांनी हा विषय तेथेच संपवला होता. मात्र आता सरकारने शिक्षण खात्यामार्फत विद्यालय व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावून शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर दबाव आणल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कचऱ्याची दुर्गंधी होत असलेल्या प्रश्नाला बगल देण्यासाठी महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा टाकलेल्या विषयाचे भांडवल करून सरकार राजकारण करू पाहात आहे, अशी प्रतिक्रिया आज काहींनी "गोवादूत'शी संर्पक साधून व्यक्त केली.
मळा परिसरात मेरी इमॅक्युलेट, के.बी. हेडगेवार, पीपल्स हायस्कूल, मुष्टिफंड प्राथमिक विद्यालय व सेव्हंथ डे ऍडव्हांटेजीस या पाच विद्यालयांत सुमारे ६ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यांना कचऱ्याच्या दुर्गंधीने हैराण करून सोडले आहे. पणजी पालिकेने प्रायोगिक तत्वावर मळा येथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला होता. मात्र तो प्रकल्प अपयशी ठरल्याल्याने तेथे असह्य दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. यासंदर्भात महापालिका, शिक्षण खाते तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. विद्यार्थ्यांना दुर्गंधीपासून मुक्त करण्यासाठी कोणतीही पावले उचलेलण्यात आली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबून महापौरांच्या टेबलावर आणि खुर्चीवर कचरा ओतून प्रशासनाला जाग आणली होती.

"हे तर जखमेवर मीठ'
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शिक्षण खाते करत असून विद्यार्थ्यांना कचराप्रश्नावर पाठिंबा देण्याचे सोडून ंव्यवस्थापनांना नोटिसा काढून त्यांची छळणूक केली जात असल्याचा आरोप गोवा पीपल्स फोरम व मदर अर्थ या संघटनांनी केला आहे. शिक्षण खात्याने कचरा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे या प्रश्नांवर विद्यालयाने नोटिसा बजावण्याचा कोणताही नैतिक अधिकार या खात्याला नसल्याची टीका या संघटनांचे निमंत्रक ऍड. सतीश सोनक व अनिल केरकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलेले असून महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा टाकल्याने सरकारने त्यासाठी विद्यार्थ्यांना "शौर्य पुरस्कार' द्यायला हवा, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. शिक्षण खात्याने दीड वर्षे विद्यार्थ्यांच्या आरोग्य बाबतीत कोणतीही काळजी घेतली नसल्याने खात्याच्या विरोधात बाल आयुक्तालयात तक्रार दाखल केली जाणार असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

No comments: