Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 18 November, 2008

चिंचोळे भागात खळबळ: पिंपळेश्वर दत्त मंदिरातील पिंडीका अज्ञातांनी तोडली

- भाविक संतापले - चौकशीसाठी सातजण ताब्यात
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गेल्या वर्षभरापासून दक्षिण गोव्यात हिंदूच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणारी टोळी उत्तर गोव्यातही सक्रिय झाली असून आज पहाटे चिंचोळे भाटले येथे श्री क्षेत्र पिंपळेश्र्वर दत्त मंदिराच्या बाजूला असलेली पिंडीका समाजकंटकानी तोडून टाकल्यामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. रात्री उशिरा चौकशीसाठी सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण केले असता, सुमारे एक किलोमीटर माग काढत श्वान ताळगाव बगल रस्त्याच्या बाजूला असलेल्या एस.एम. शुब्रती शेख याच्या मालकीच्या घरात गेला. तथापि, तेथे कोणीच राहात नसून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कलाकृती केल्या जात असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्या ठिकाणी काम करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या २९५ व १५३ (अ) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याविषयीची पोलिस तक्रार देवस्थान समितीचे कारकून निवृत्ती पालेकर यांनी सादर केली आहे. सकाळी स्थानिक आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर, शिवसेना पक्षाचे गोवा राज्य प्रमुख उपेन्द्र गावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी गवंडी राहात आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास हरी आंर्दुलेकर हा शौचालयात जाण्यासाठी बाहेर आला असता, ही घटना उघडकीस आली. मूर्तिभंजकाने मोठ्या घणाच्या साहाय्याने मंदिराच्या बाजूला असलेल्या पिंडीची तोडफोड करण्यासाठी प्रहार केलेल्या आवाजानेच त्याला जाग आली. यावेळी मोडतोड करून जाताना एक व्यक्तीला पाहिल्याचा दावा हरी आंर्दुलेकर यांनी केला आहे. "त्या व्यक्तीने पांढरा व काळी हाफ पॅंट घातल्याचे आंर्दुलेकर यांनी सांगितले.
पोलिसांनी यावेळी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञाची मदत घेतली. मात्र त्याचा अधिक उपयोग झाला नाही. याठिकाणी कोणतेही ठसे मिळाले नसल्याचे, ठसे तज्ज्ञांनी सांगितले.
घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, गुन्हा अन्वेषण विभागाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणारे पोलिस अधीक्षक वामन तारी, उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर, उपअधीक्षक सेमी तावारीस, पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त तसेच अन्य पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे मंदिरांतील मुर्तींची मोडतोड करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास स्थापन करण्यात आलेल्या पथकानेही याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
शिवसेना ः या प्रकरणातील समाजकंटकांना त्वरित अटक करावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली आहे. राज्यात मूर्ती तोडफोड सत्र सुरूच असून आरोपींना अटक करण्यास राज्य प्रशासनाला अपयश आल्याची टीका यावेळी उप राज्यप्रमुख नामदेव नाईक यांनी केली. यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख दामू नाईक, पणजी शहर प्रमुख श्रीकृष्ण वेळुस्कर, मंदिर सुरक्षा समितीचे केपे तालुका अध्यक्ष आनंद प्रभुदेसाई, ऍड. नरेश च्यारी व समीर च्यारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

No comments: