Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 21 February, 2011

सरकारकडून लोकांची दिशाभूल : नार्वेकर

• कळंगुट बागा येथे पीपीपीविरोधात बैठक
म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी): सरकारचा पीपीपीचा डाव हाणून पाडण्यासाठी कळंगुट- बागातील लोकांनी संघटित व्हावे. विद्यमान सरकारने गोवा विकायला काढलेला आहे. सरकारला खनिजवाल्यांनी विकत घेतले आहे. वविध धोरणांच्या नावाखाली सरकारने लोकांची दिशाभूल चालवली असून ही लोकशाही नव्हे तर राजेशाही, हुकूमशाही आहे. असा आरोप यावेळी श्री. नार्वेकर यांनी केला.अशावेळी आपल्या सुरक्षेसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल असे आवाहन हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी केले. बागा समुद्र किनार्‍यालगत इको टुरिझमच्या नावाखाली पीपीपीच्या धर्तीवर हॉटेल सुरू करण्याच्या विरोधात कळंगुट बागा येथील नागरिकांनी आज (दि.२०) एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत ऍड. नार्वेकर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत रापणकारांचो एकवोटचे माथानी साल्ढाणा, म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर,जिल्हा पंचायत सदस्य आबेलिना मिनेझिस, अँथनी मिनेझिस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. नार्वेकर यांनी सांगितले की, आज गोव्यात अनेक अनैतिक घटना वाढत असल्याने पर्यटकांसाठी गोवा असुरक्षित बनला आहे. विद्यमान सरकारमधील तीन मंत्री तर केवळ पैसा कसा कमवावा यातच मग्न आहेत अशी टीका केली. विद्यमान सरकारचा कारभार पाहता पुढील निवडणुकीत हे सरकार सत्तेवर येणार नाही. सरकारचे विविध कुटील डाव आम्ही हाणून पाडले नाहीत तर पुढील पिढी आम्हांला माफ करणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री गोव्याला सध्या ‘दिगंबर’ करायला निघाले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
गोवा राखून ठेवण्याची जबाबदारी स्थानिकांवर व गोमंतकीयांवरच आहे. मात्र सरकार गोमंतकीयांना वेडे समजत आहे अशी टीका यावेळी श्री. साल्ढाणा यांनी केली. गोव्याच्या हितासाठी गोमंतकीयांनी आत्तापासूनच जात-पात, धर्म-भाषा विसरण्याची वेळ आल्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी श्री. डिसोझा यांनी पीपीपीला विरोध करत हे सरकार एकदम भ्रष्ट असल्याचा आरोप केला. यावेळी मायकल लोबो, प्रकाश बांदोडकर, ऍड. यतिश नायक यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन गोरख मांद्रेकर यांनी केले.

No comments: