Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 February, 2011

चिखली अपघातात तीन गंभीर जखमी


स्थानिकांकडून टँकरची नासधूस

वास्को, दि. २५(प्रतिनिधी)
आज (दि.२५) रात्री उशिरा चिखली येथे टँकर व दोन मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जोडपे व एक युवक गंभीररित्या जखमी झाले. वाडे येथे राहणारा नरेंद्र सिंग (४८) व त्यांची पत्नी इंदू (४२) घरी परतत असताना टँकरने त्यांना मागून धडक दिली. त्यानंतर समोरून येणार्‍या मडगाव येथील जोझेफ कॉस्ता (२३) याच्या दुचाकीला जबर धडक दिली. सदर अपघातानंतर येथे असलेल्या संतप्त जमावाने टँकर चालकाची धुलाई करून टँकरची नासधूस केली.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्री ८.३० च्या सुमारास सदर अपघात घडला. नरेंद्र सिंग व त्यांची पत्नी ही दोघेही ‘स्प्लेंडर दुचाकीने (जीए ०८ एल १८७०) घरी येत असताना चिखली जंक्शनच्या पूर्वी असलेल्या रस्त्यावर ते पोहोचले असता मागून येणार्‍या टँकरने (जीए ०१ झेड २७१५) त्यांना जबर धडक दिली. त्यामुळे उभयता रस्त्यावर कोसळली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. सिंग यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर पुढच्या बाजूने येणार्‍या जोझेफ कॉस्ता यांच्या ‘एफ. झी’ दुचाकीला (जीए ०६ सी ४१२८) सदर टँकरने जबर धडक दिली. सदर भीषण अपघातात एक जोडपे व जोझेफ हा युवक गंभीर जखमी झाली. हे वृत्त कळताच स्थानिकांनी तिघांनाही त्वरित चिखलीच्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर स्थानिकांनी प्रथम टँकरची नासधूस केली. त्यानंतर टँकरचालक अनिल कुमार सिंग याचीही धुलाई केली.
वास्को पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यांनी नंतर टँकर चालकाला ताब्यात घेतले. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार तिघा जखमींची प्रकृती गंभीर आहेत. वास्को पोलिस सदर अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.

No comments: