Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 February, 2011

वास्कोतील चार पोलिस निलंबित

मायकल फर्नांडिस पलायन व ‘आइस्क्रीम’ प्रकरण भोवले
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): तब्बल २२ खटले नावावर असलेला मायकल फर्नांडिस हा कैदी काल (दि.२२) पोलिस व्हॅनच्या खिडकीतून उडी मारत पलायन केल्याचे तीव्र पडसाद उमटले असून या संदर्भात वास्कोतील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अन्य एका प्रकरणी सध्या सडा उपकारागृहात कैद भोगणारा बालेश देसाई याला वैद्यकीय चाचणीसाठी नेताना वाटेत ‘आइस्क्रीम पार्लर’वर थांबा घेतल्याचा प्रकार एका वृत्तवाहिनीने उघडकीस आणल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रदीप पाटील व सुरज गावकर या दोन्ही पोलिस शिपायांनाही निलंबित करण्यात आले आहे.
गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांची दोन कोटी रुपयांना सुपारी घेतल्याची जबानी दिलेला अट्टल गुन्हेगार मायकल फर्नांडिस पोलिस व्हॅनमधून फरारी झाल्याने गोवा पोलिसांची झोपच उडाली आहे. याचाच परिपाक म्हणून मायकल याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस शिपाई गौरेश पेडणेकर व सदानंद मळीक यांच्या निलंबनाचा आदेश आज जारी करण्यात आला.
आज पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना पोलिस प्रवक्ते तथा विशेष विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी ही माहिती दिली. मायकल फर्नांडिस याचे फरार होणे यात पोलिसांचे सोटलोटे असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. तूर्त प्राथमिक अंदाजानुसार यात पोलिसांचा निष्काळजीपणाच दिसून येतो, असे सांगत चौकशीअंती सत्य उघड होईल, असे ते म्हणाले. मायकल फर्नांडिस हा फरारी झाल्याने पुन्हा एकदा गृहमंत्र्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान करण्यात येईल काय, असा सवाल केला असता त्याबाबत वरिष्ठ अधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
सडा उपकारागृहात कैदेत असलेला बालेश देसाई याला वैद्यकीय चाचणीसाठी चिखली येथील कुटीर इस्पितळात नेले होते. या दरम्यान वाटेत एका आइस्क्रीम पार्लरमधील आइस्क्रीमवर ताव मारताना या पोलिस शिपायांना वृत्तवाहिनी तथा वृत्तपत्र छायाचित्रकारांनी हेरल्याने व हे वृत्त प्रसिद्ध झाल्याने पोलिसांची बरीच नाचक्की झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिस शिपाई प्रदीप पाटील व व सुरज गावकर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. वास्को पोलिस स्थानकातील एकाच वेळी चार पोलिस शिपाई निलंबित होण्याची ही पहिलीच घटना घडली आहे.
दरम्यान, मायकल फर्नांडिस याला नेणार्‍या पोलिस व्हॅन गाडीत अन्य सात कैदी होते व त्यांच्याबरोबर चालकासह १५ पोलिस शिपाई होते, अशीही माहिती मिळाली आहे. ही व्हॅन कैद्यांना नेणारी नव्हती व त्यामुळे खिडकीजवळ बसलेल्या मायकलने संधी साधून चालत्या वाहनातून उडी घेतली. या व्हॅनच्या मागोमाग येणार्‍या दुचाकीवरून त्याने पळ काढल्याने त्याने सुनियोजितपणेच पलायन केल्याचेही उघड झाले आहे. मायकल याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचेही यावेळी श्री. देशपांडे यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
हुमाणे चोरीत मायकल ?
काणकोण, दि. २३ (प्रतिनिधी): हुमाणे आगोंद येथून काल (दि.२२) रात्री १०.३० च्या दरम्यान एक विदेशी महिला रिक्षाने जात असताना मागून येणार्‍या दोन दुचाकीवरील चार व्यक्तींनी रिक्षा अडवली. यावेळी त्यांनी रिक्षाचालकाला कळण्याअगोदरच सदर महिलेची पर्स लंपास केली. सदर पर्समध्ये एक डिजिटल कॅमेरा, रोख रु. ३००० व अन्य वस्तू मिळून एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी पोलिस तक्रार केली असता काणकोणचे पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी सदर महिलेला संशयित चोरट्यांची छायाचित्रे दाखवली. त्यावेळी त्यात मायकल फर्नांडिस याचेही छायाचित्र होते. सदर महिलेने मायकलचे छायाचित्र ओळखून हीच व्यक्ती आपली पर्स घेऊन गेल्याचे सांगितले. कालच मायकल याने पोलिस व्हॅनमधून पलायन केले व लगेचच त्याने ही चोरी केली त्यामुळे मायकल हा किती सराईत गुन्हेगार आहे याची प्रचिती येते असे यावेळी सूत्रांनी सांगितले.

No comments: